सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी हरियाणा सरकारने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. सोनाली फोगट यांच्या हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे हरियाणा सरकारने म्हटले आहे. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी लेखी अर्ज दिला.
दरम्यान, या हत्येमध्ये मोठे चेहरेही असू शकतात, असे गंभीर आरोप सोनाली यांच्या कुटुंबीयांनी केले आहेत. कुटुंबीयांच्या पत्राच्या आधारे हरियाणा (Haryana) सरकारने गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असे म्हटले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) सांगितले की, सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांनी लावलेले काही आरोप आणि संशयाची पुष्टी करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचे एक पथक उद्या हरियाणातील हिस्सारला भेट देणार आहे.
गरज भासल्यास सोनाली फोगट खून प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात येईल, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी म्हटले आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचे सीएम सावंत यांनी सांगितले. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना तपासाबाबत अवगत केल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व अहवाल डीजीपी हरियाणा यांना पाठवण्यात आले आहेत. गरज पडल्यास सीबीआयचेही सहाय्य घेतले जाईल.