सोनिया गांधी आज राहणार EDसमोर हजर
नवी दिल्ली:
‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज 21 जुलै रोजी ईडीसमोर हजर होणार आहेत. यापूर्वी ईडीने राहुल गांधींची पाच दिवस चौकशी केली आहे.
त्याचवेळी आज ईडी कार्यालयात सोनिया गांधी यांच्या चौकशीबाबत काँग्रेस नेत्यांनी रणनीती तयार केली आहे. काँग्रेस पक्ष आज देशव्यापी आंदोलन करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या हजेरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी सकाळी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असून, त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते आणि खासदार दिल्लीत उपस्थित आहेत. भारतीय युवक काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) चे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही दिल्लीत पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे की, “आमच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध मोदी-शाह जोडीकडून ज्या पद्धतीने राजकीय सूडबुद्धी सुरू आहे, त्याविरोधात काँग्रेस पक्ष उद्या आपल्या नेत्या सोनिया गांधींसोबत सामूहिक एकता व्यक्त करत देशभरात निषेध व्यक्त करेल.”