
समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम
पणजी :
गोवा सरकारचे पर्यटन खाते, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक श्वान निर्बीजीकरण आणि उपचार मोहीम सुरू करणार आहे. सार्वजनिक सुरक्षा, प्राणी कल्याण आणि स्वच्छ पर्यटन अनुभव सुनिश्चित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सोमवारपासून, निर्बीजीकरण आणि उपचार कार्यक्रम विविध समुद्रकिनाऱ्यांवर राबविला जाईल. यातील ठिकाणां संदर्भात तपशीलवार माहिती संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वयित केली जाईल. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जखमी कुत्र्यांना वाचवून त्यांच्यावर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन केले जाईल.
या उपक्रमाविषयी बोलताना पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, कि “पर्यटन खाते सुरक्षित आणि जबाबदार पर्यटन परिसंस्थेची खात्री करण्यासाठी वचनबद्ध आहे. या श्वान निर्बीजीकरण आणि उपचार मोहिमेमुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला आळा घालण्यात मदत होणार तसेच अधिक स्वच्छ आणि प्राण्यांसाठी अनुकूल अशा वातावरणाला प्रोत्साहन दिले जाईल. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीसाठी आम्ही सर्व भागधारकांना या उपक्रमाला सहकार्य आणि पाठिंबा देण्याची विनंती करतो.”
रेबीजशी लढण्यास गोव्याच्या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी, ‘मिशन रेबीज हॉटलाइन’चा होर्डिंग्स आणि जनजागृती मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जाईल.