‘देवस्थान जमिनीसंदर्भात लवकरच शुद्धिपत्रक काढणार’
सातारा ( महेश पवार) :
वावदरे, लुमनेखोल, यवतेश्वर, सोनगाव आदी गावांमध्ये देवस्थान जमिनीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांची नावे सदर जमिनीवर नसल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाचाही लाभ घेता येत नाही. अशा जमिनींबाबत तातडीने निर्णय घेऊन संबंधित शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी तातडीने निर्णय घेण्याची सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वावदरे, लुमनेखोल, यवतेश्वर, सोनगाव या गावांमध्ये दि. ११ रोजी शिबीर घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने निर्णय घेऊ, असे सांगितले.
वावदरे, लुमनेखोल आदी गावांमध्ये जमिनीच्या सातबारावरील नावे कमी करण्यात आलेली नावे कब्जेदार सदरी कायम कुळ नसल्याने अशा खातेदारांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा खातेदारांवर अन्याय होत आहे. अशा शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, भिकुभाऊ भोसले, बबन देवरे, श्रीरंग देवरुखे, सरपंच रामचंद्र जगताप, उप सरपंच रघुनाथ जगताप, जगन्नाथ जंगम, शामराव जगताप, रोहिदास जगताप, बबन साळुंखे, ताया देवरे, माणिक जगताप आणि शेतकरी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत वावदरे, लुमनेखोल यासह यवतेश्वर, सोनगाव (माहुली) येथील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती या चारही गावांमध्ये दि. ११ रोजी महसूल विभागामार्फत शिबीर घेऊन शुद्धिपत्रक करणे तसेच शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ कसा देता येईल, याबाबत निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली निघणार असल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.