अन्नामध्ये किडे; विद्यापीठातील कॅन्टीनचा करार रद्द करण्याची मागणी
पणजी :
गोवा विद्यापीठाच्या हॉस्टेल मधील कॅन्टीन मध्ये जेवणात किडे आढळल्याने त्यांचा करार तात्काळ रद्द करुन नवीन व्यक्तीला ही जबाबदारी द्यावी अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) केली आहे.
एनएसयूआयचे प्रमुख (गोवा विद्यापीठ) रुषभ फळदेसाई यांनी यासंदर्भात गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र लिहून ही घटना त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्टीनच्या अन्नामध्ये किडे आढळून येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारी आहेत.
यासाठी कॅन्टीनचा ठेका रद्द करून नव्याने निविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. रुषभ फळदेसाई यांनी अन्नाचा दर्जा नियमित तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
“अशा घटना घडत आहेत कारण अधिकारी गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी असूनही त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हे अस्वीकार्य आहे,” असे ते म्हणाले.
“विद्यार्थ्यांना बाहेरील भोजनालयातून जेवण घेण्याची प्रवृत्त केले जात आहे, जे खूप महाग आहे आणि विद्यार्थ्यांना ते परवडत नाही. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी त्वरित पाऊल उचलावे आणि नवीन कराराची व्यवस्था करावी,” असे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.