
‘प्रभू श्रीरामाचा राजकारणासाठी वापर थांबवा’
पणजी:
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपकडून सतत रामराज्य या पवित्र संकल्पनेचा राजकीय प्रचारासाठी गैरवापर केला जातोय, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. रामराज्य म्हणजे न्याय, समता, सर्वसामान्यांचे कल्याण, दुर्बळांचे संरक्षण आणि सत्य व धर्मावर आधारित प्रशासन. भाजप सरकार खरोखरच हे आदर्श गोव्यात पाळते का? असा सवाल काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी उपस्थित केला आहे.
अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना चार प्रश्न उपस्थित केले असून, त्याची त्यांनी गोमंतकवासियांना उत्तर द्यावीत अशी मागणी केलीय.
पणजीकरांनी उपस्थित केलेले प्रश्न :
१) गोव्यातील बेरोजगारी कमी केली आहे का? उलट गोव्यात देशात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बेरोजगारी आहे. रोजगारनिर्मितीसाठी कोणती योजना आहे?
२) कायदा आणि सुव्यवस्था योग्य आहे का? गोव्यात आणि देशभरात बेरोजगारी, चोरी, बलात्कार, लूटमार आणि भ्रष्टाचार वाढत आहेत, हे वास्तव भाजप सरकार नाकारू शकत नाही.
३) महिलांची आणि लहान मुलांची सुरक्षितता आहे का? सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी सरकारने नेमके काय केले?
४) व्यक्तीस्वातंत्र्य आहे का? आज कोणी आपले मत व्यक्त केले तर त्याला त्रास दिला जातो ही वस्तूस्तिती आहे.
ही परिस्थिती रामराज्याची नसून, ही लोकांच्या दुःखाची आणि सरकारच्या अपयशाची गोष्ट आहे. हे भाजपचं रामराज्य नाही. हे प्रभू श्रीरामांच्या आदर्शांची विटंबना आहे, असा आरोप पणजीकरांनी केला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा गोवा प्रदेश काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. भाजपने धर्माचा स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणासाठी वापर थांबवावा. प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक करणे हा मोठा अपमान आहे, असे पणजीकरांनी म्हटले आहे.