लेख
न्यायाच्या उजेडात ‘तिरुप्परनकुंड्रम दीपम’
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूतील तिरुप्परनकुंड्रम टेकडीवरचा कार्तिकै दीपम देशभरात एकदम चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. वास्तविक तिरुप्परनकुंड्रमच्या कार्तिकै दीपमचे तामिळ समाजात महत्वाचे स्थान आहे. पिढ्यानपिढ्या लोक या टेकडीवर जातात आणि श्रद्धेने त्या ठिकाणी तो परंपरेने दीप प्रज्वलित करतात. गावकऱ्यांसाठी, भाविकांसाठी, हा दिवा रोजच्या जगण्यातला एक भाग आहे. असे असताना गेल्या काही महिन्यांत हा शांतपणे तेवणारा दिवा अचानक वादाच्या केंद्रस्थानी का आणि कसा आला, याचे उत्तर अनेक पातळ्यांवर शोधावे लागेल.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने महिनाभरापूर्वी या टेकडीवरील मंदिरात दीप प्रज्वलन करण्याचे निर्देश दिले होते. एका कार्यकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांनी राज्य अधिकाऱ्यांना पवित्र दीप टेकडीच्या शिखरावरच लावला जावा, असे आदेश दिले होते. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी याला विरोध करत, अनेक वर्षांपासून ‘दीपा मंडपम’मध्ये दीप लावण्याची परंपरा असल्याचे सांगितले होते. तसेच अशाप्रकारे मंदिर आवारात दीप प्रज्वलित केला तर कायदा सुवस्थेचा प्रश्न तयार होऊ शकतो, असाही युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला होता. त्यानंतर डिसेम्बरमध्ये याठिकाणी काही हिंदू भाविक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, मंदिराच्या जमिनीवर मंदिर व्यवस्थापनाने दिवा लावल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, ही भीती वास्तवावर आधारित नाही. न्यायालयाने या भीतीला ‘काल्पनिक भूत’ असे म्हटले. ही टिप्पणी केवळ तांत्रिक नाही, तर प्रशासकीय मानसिकतेवर बोट ठेवणारी आहे. राज्याला स्वतःच्या यंत्रणांवर इतका अविश्वास वाटावा, ही बाब चिंताजनक आहे. कारण कायदा सुव्यवस्था राखणे हे राज्याचे कर्तव्य असते. त्या कर्तव्यापासून पळ काढण्यासाठी भीतीचे कारण पुढे करणे, ही भूमिका कोणत्याही सरकारला सत्तेला निश्चितच शोभणारी नाही. पण तरीही हाच मुद्दा राज्याच्यावतीने पुढे करण्यात आला.
या प्रकरणात कायदेशीर बाबीही तितक्याच स्पष्ट झाल्या आहेत. ‘दीपथून’ ज्या जमिनीवर आहे, ती जमीन दिवाणी न्यायालयाने देवस्थानाची मालमत्ता म्हणून घोषित केली आहे. तरीही काही संस्थांनी आक्षेप घेतले. त्याचप्रमाणे वक्फ बोर्डाकडूनही या जमिनीवर दावा करण्यात आला. आणि न्यायालयाने तो दावा साक्षी-पुराव्याच्या आधारे फेटाळून लावताना सांगितले की या प्रकरणात त्यांचा थेट अधिकार नाही. न्यायालयाने या संपूर्ण निकालात कुठेही भावनिक भाषा वापरलेली नाही. किंवा कुठेही धार्मिक बाजू घेतली नाही. केवळ कायदा, परंपरेचा पुरावा, मालकी हक्क आणि घटनात्मक चौकट या आधारांवर निर्णय दिला. म्हणूनच हा निकाल महत्त्वाचा ठरतो.
दुसरीकडे कार्तिकै दीपमची परंपरा फक्त धार्मिक चौकटीतून पाहता येत नाही. तमिळ समाजात हा दीप हा सर्वार्थाने एक सांस्कृतिक अनुभव, लोकस्मृतीचा भाग आहे. अनेक कुटुंबांमध्ये आजही मुलानं लहानपणापासून विविध कथांमधून या टेकडीवरील त्या दिव्याचे आणि त्याच्याप्रती असलेल्या असीम श्रद्धेचे नाते सांगितले जाते. आणि अर्थात त्याचवेळी या टेकडीवर एक दर्गा आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. त्या दर्ग्याच्या इतिहासही मान्य करावा लागतो. पण दीपोत्सवाची परंपरा दर्ग्याच्या स्थापनेपेक्षा जुनी असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ सूचित करतात. अशावेळी प्रशासनाने अत्यंत समतोल भूमिका घेत दोन्ही परंपरांना मान देणे, दोन्ही समुदायांमध्ये संवाद घडवून आणणे, विश्वास निर्माण करणे अपेक्षित असते. या प्रकरणात मात्र स्थानिक डीएमके सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच सावध कमी आणि अस्वस्थ अधिक दिसून येत होती. न्यायालयाचा आदेश आल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने तो तात्काळ अंमलात आणण्याऐवजी वेळकाढूपणा केला. कायदेशीर सल्ल्याचा आधार घेत निर्णय पुढे ढकलण्यात आला. काही मंत्र्यांनी वारंवार कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे केला. आणि परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली की अखेरीस न्यायालयाला केंद्रीय सुरक्षा दलाच्या संरक्षणाखाली आदेशाची अंमलबजावणी करावी लागली. लोकशाही व्यवस्थेत हे चित्र काही फारसे समाधानकारक नाही. न्यायालय आदेश देते आणि कार्यकारी सत्ता तो अंमलात आणते, असे घटनात्मकदृष्ट्या होणे अपेक्षित होते. पण त्यातच दिरंगाई करण्याकडे सरकारचा कल दिसून आला.
या सगळ्या वादात काही याचिका सर्वोच्च न्यायालयातदेखील दाखल करण्यात आल्या. न्यायालयाच्या अवमानाचीही देशभरात चर्चा झाली, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एका दिव्यासाठी एवढी प्रशासकीय ऊर्जा खर्च व्हावी लागणे, हे काही आपल्या देशाला परवडणारी बाब नाही. वास्तविक हा सगळा वेळ आणि ऊर्जा आणि प्रशासकीय सहकार्य दोन्ही समाजासोबत संवाद साधण्यासाठी, समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी वापरली गेली असती, तर कदाचित हा प्रश्न इतका ताणला गेला नसता. पण असे होताना कुठेच दिसले नाही. धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या सार्वजनिक चर्चेत वारंवार वापरला जातो. पण अनेकदा त्याचा अर्थ गोंधळात टाकणाऱ्या पद्धतीने लावला जातो. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कोणत्याही परंपरेला दडपणे असा नसतो. सर्व परंपरांना समान आदर देणे, सर्व समुदायांना समान न्याय देणे, ही तिची खरी भावना आहे. आणि जर सरकार किंवा प्रशासन स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवत असेल तर, त्यांना आपली धर्मनिरपेक्षतात दाखवण्याची हि एक उत्तम संधी होती. पण तसे काही होताना दिसले नाही.
तिरुप्परनकुंड्रमचा दीपम वाद म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. कारण तो केवळ एका टेकडीवरच्या दिव्याचा प्रश्न नाही. तो भावनिक परंपरा आणि राजकीय सत्ता यांच्यातील नात्याचा प्रश्न आहे. तो न्यायालय आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा प्रश्न आहे. तो नागरिक आणि राज्य यांच्यातील विश्वासाचा प्रश्न आहे. न्यायालयाने या प्रकरणात जे ठामपणे उभे राहून केले, ते आश्वासक आहे. कारण लोकशाहीचे सगळेच खांब जेव्हा उन्मळू लागतात तेव्हा सर्वसामान्यांना विश्वास फक्त न्यायसंस्थेवरच टिकून राहतो. त्यामुळे याच न्यायसंस्थेमुळे टेकडीवर तेवत रहाणारा तो दीप अखेरीस फक्त श्रद्धेचा नाही. तो विवेकाचा, संविधानिक मूल्यांचा आणि संस्थात्मक धैर्याचा दीप आहे. आणि कदाचित याच प्रकाशात सत्तेलाही स्वतःकडे पाहण्याची संधी मिळू शकते.


