पाकिस्तानात ट्रेनचे भाडे तब्बल 10,000 रुपये
पाकिस्तान (pakistan) दिवसेंदिवस कर्जात बुडत चालला आहे. आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकाटाचाही सामना पाकिस्तान सध्या करत आहे. विजेचे दिवसेंदिवस वाढत चाललेले संकट आणि पेट्रोलचे वाढलेले दर याचा फटका बसत आहे. आता वाढलेल्या रेल्वे भाड्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. रेल्वे प्रवास महाग झाला आहे. आता एका तिकिटाची किंमत 10,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वीज आणि पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमतींनंतर पाकिस्तानमध्ये (pakistan) रेल्वेचे भाडे वाढले आहे.
सध्या, पाकिस्तानची स्थिती चांगली नाही. पाकिस्तानी नागरिकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. मात्र, देशातील सरकार केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहे. तिजोरीत पैसे नसताना नुसते बोलून काहीच करता येत नाही. आता पाकिस्तानातील लोकांनाही ही गोष्ट समजू लागली आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचे शाहबाज शरीफ सरकार प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे.
अलीकडेच, पाकिस्तानच्या विद्युत विभागाने विजेचे दर वाढवले आहेत. आता पाकिस्तानच्या (pakistan) रेल्वे मंत्रालयाने देशातील विशेष ट्रेनच्या भाड्यात 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वस्त वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनकडून पाकिस्तानने ट्रेन मागवली आहे.
तसेच, पाकिस्तानने गेल्या महिन्यातच 20 डिसेंबरपासून चीनमधून बनवलेल्या या ग्रीनलाइन एक्सप्रेस ट्रेनची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आता 27 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही ग्रीनलाइन एक्सप्रेस ट्रेन इस्लामाबाद ते कराची दरम्यान धावणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने ग्रीन लाइन ट्रेनच्या भाड्यात 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वाढ करुन पाकिस्तान सरकार प्रवाशांच्या खिशातून पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा डाव आखत आहे.
ग्रीन लाइन एक्सप्रेस ट्रेनमध्ये 2 एसी पार्लर, 5 एसी बिझनेस, 6 एसी स्टँडर्ड आणि 4 ते 5 इकॉनॉमी क्लासचे डबे आहेत. पाकिस्तान रेल्वेने रावळपिंडी ते कराची या ग्रीन लाइन ट्रेनचे इकॉनॉमी क्लास तिकीट 4000 रुपये केले आहे. त्याचवेळी, कराची ते रावळपिंडीचे एसी तिकीट 8000 रुपये करण्यात आले आहे, जी पाकिस्तानी प्रवाशांसाठी मोठी रक्कम आहे.