सातारा (महेश पवार) :
राष्ट्रवादीची खासदारकी सोडून भाजप मध्ये डेरेदाखल झालेल्या खा. उदयनराजे भोसले यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजीनाम्यांनंतर पोट निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता, मात्र आता सातारा लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड राहणार आहे.
उदयनराजेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केली असली तरी अजूनही उमेदवारी ‘फिक्स’ झालेली नाही. त्यामुळे महायुतीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळ घालण्याचे आव्हान उदयनराजेपुढे असणार आहे, हे नुकत्याच झालेल्या महायुतीच्या बैठकीवरून दिसत आहे. त्यामुळे याहीवेळी खा. उदयनराजेंसाठी लोकसभेची वाट बिकट असेल असे राजकारणातील जाणकारांचे मत आहे.
फर्न हॉटेल येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 12 वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपसह राष्ट्रवादीच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यानी, कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. उदयनराजे या बैठकीच्या ठिकाणी १२ च्या सुमारास आले आणि ‘कोरम’ पूर्ण नसल्याचे पाहून तेही दोनतीन मिनिटातच निघून गेले. बहुदा महायुतीचा उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला नसल्याने या बैठकीकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. असे असले तरी उदयनराजेंनी मात्र आपण महायुतीचे उमेदवार असल्याचे एकप्रकारे जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. दोन्हीकडून सस्पेन्स कायम ठेवण्यात आल्याने उमेदवार कोण? याकडे लक्ष लागून राहिले आहे. उदयनराजेंनी मात्र प्रचार सुरु केला असल्याने महायुतीकडून उदयनराजेंनाच उमेदवारी मिळेल असा कयास बांधला जात आहे पण, शरद पवारांच्या महाविकास आघाडीकडून ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेण्यात आली आहे. महायुतीचा उमेदवार ठरला कि शरद पवार आपला पत्ता ओपन करतील, असे मानले जात आहे.
पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील याना उभे करून पवार साहेबांनी आपली मुत्सद्देगिरी पुन्हा एकदा दाखवून दिली होती. त्यामुळे याही निवडणुकीत शरद पवार महायुतीला आणि खास करून उदयनराजेंना ‘धक्का’ देण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. सद्य परिस्थिती पाहता सातारा मतदारसंघावर महायुतीची पकड असली तरी निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही हे वास्तव आहे. त्यामुळे उदयनराजेंना महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोट बांधून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे.
…