“अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण वरकरणी दिसतं, तेवढं सोप नाही. ज्या गुडांने सूडभावनेतून हत्या केली, असे आपण समजू. पण त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या का केली? हा प्रश्न निर्माण होतो. ज्याप्रमाणे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ कुणीही न मागता समोर आला. तसे मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले होते. पण त्यामध्ये नेमक्या गोळ्या कुणी झाडल्या हे दिसत नाही”, अशी शंका उपस्थित करून शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी काल काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. तेव्हा त्यांनी माहिती दिली की, मॉरिसकडे परवानाधारक बंदूक नव्हती. त्याने खासगी सुरक्षा रक्षक ठेवला होता. त्याला सुरक्षारक्षक ठेवण्याची वेळ का आली? या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून या गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जाते. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की आणखी कुणी झाडल्या? या दोघांनाही मारण्याची सुपारी कुणी दिली होती का? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.