समाजात दंगे होऊ देणार नाही : रेखा ठाकूर
मुंबई (अभयकुमार देशमुख) :
महाराष्ट्रात दंगली अथवा सामाजिक शांतता भंग होऊ नये या करीता १ मे रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शांतता मार्च काढण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दंगे घडविण्याच्या दृष्टिकोनातून धार्मिक तेढ वाढवणारी भाषणे केली आहेत आणि म्हणून त्यांना औरंगाबादमध्ये सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती परंतू महाराष्ट्र सरकारचे वागणे अनाकलनीय आहे त्यांनी या सभेला परवानगी दिली आहे. याचा अर्थ दंगे भडकविण्यासाठी महाविकास आघाडी पोषक आहे अशी परिस्थिती आहे. दंगली घडू नये म्हणून पायबंद घालण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीने स्वीकारली आहे. स्वार्थी राजकारणासाठी केले जाणारे हे प्रयोग आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. महाराष्ट्रात दंगली भडकणार नाही यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शांतीचा संदेश देणारा शांतता मार्च १ मे रोजी काढण्यात येणार आहे. समाजात धार्मिक सद्भावना आणि सलोखा, शांती बिघडू न देणे, समाजात जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले आहे. समाजात दंगे होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देखील हीच भूमिका प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मांडली होती. याच धर्तीवर १ मे रोजी शांतता मार्चची जोरदार तयारी करण्यात येत असून त्याकरिता साडेसातशे युनिट कामाला लागले आहेत. हा शांतता मार्च यशस्वी करण्यासाठी वंचितचे सर्व स्तरावरील नेते, पदाधिकारी कायकर्ते मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असल्याचे देखील रेखा ठाकूर यांनी दिली.