सध्या आठवड्यातून ‘इतके’ दिवस धावणार ‘वंदे भारत’
मडगाव :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोवा (मडगाव)- मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसह पाच वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवून आरंभ केला. गोव्यात मडगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती होती. नव्याने सुरू झालेली ट्रेन पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा आणि पावसाळ्यात नसलेल्या काळात आठवड्यातून सहा वेळा धावेल, असे कोकण रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.
गोवा (मडगाव) – मुंबई वंदे भारतच्या आरंभाप्रसंगी संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी गोव्याला पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. श्रीपाद नाईक म्हणाले की, गोव्याला पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्याबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदन. आजचा दिवस गोव्याच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. गोवा-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेससह पाच वंदे भारत रेल्वे आज सुरु झाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे 2014 नंतर देशाचा विकास दिसून येत आहे. सध्या देशात आजच्या पाच वंदे भारतच्या आरंभापूर्वी, 18 वंदे भारत एक्सप्रेस विविध राज्यांमध्ये सेवारत आहेत. संपूर्ण वातानुकुलीत असलेली वंदे भारत ही 18 डब्ब्यांची विजेवर धावणारी रेल्वे आहे. यात प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा आहेत. आगामी तीन वर्षात देशभर 400 वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतील. लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेसला स्लीपर कोच जोडण्यात येतील, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. आज गोव्यात दोन विमानतळ आहेत आणि वंदे भारत एक्सप्रेसमुळे गोव्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होण्यास नक्कीच मदत होईल, असे नाईक म्हणाले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या क्षेत्रात देशात आतापर्यंतची सर्वात मोठी क्रांती केली. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई मार्ग जोडणी देशाने पाहिली आहे. गोव्यातही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारले जात आहे. गोव्यात लवकरच मुरगाव बंदर आणि रस्ते जोडणी सुरु होईल. मोपा विमानतळावरुन गोव्यासाठी 20 नव्या शहरांना जोडणी मिळाली आहे. याचा मोठा लाभ गोव्याला होईल. डबल ट्रॅक झाल्यास वंदे भारत एक्सप्रेस पाच तासांत गोव्याहून मुंबईला पोहचता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, रेल्वेमंत्र्यांकडे मडगाव रेल्वे स्थानक पंचतारांकित करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. मडगाव रेल्वे स्थानकाचे लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्थानिक रेल्वे स्थानके आणि मोपा विमानतळसाठी लोकल रेल्वे सुरु करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
गोवा (मडगाव)- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून सुटेल आणि दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन त्याच दिवशी मडगाव स्थानकात पोहोचेल.
ट्रेन खालील वेळापत्रकानुसार धावणे अपेक्षित आहे. गाडी क्र. 22229 / 22230 मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस:
पावसाळ्यातील वेळापत्रक : (आठवड्यातून तीन वेळा)
रेल्वे क्रमांक 22229 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस 28/06/2023 ते 30/10/2023 पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 05:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 15:30 वाजता मडगाव स्थानकावर पोहचेल.
रेल्वे क्रमांक 22230 मडगाव जंक्शन – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस मडगाव जंक्शन येथून 29/06/2023 ते 31/10/2023 पर्यंत दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 12:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:25 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल.
नियमित वेळापत्रक : (शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस) :
रेल्वे क्रमांक 2229 मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेस 01/11/2023 पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार (आठवड्यातील सहा दिवस) मुंबई सीएसएमटी येथून 05:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13:10 वाजता मडगाव स्थानकावर पोहचेल.
रेल्वे क्रमांक 22230 मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस मडगाव जंक्शन येथून 01/11/2023 पासून दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार (आठवड्यातील सहा दिवस) 14:40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22:25 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल.
गोवा (मडगाव) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी स्थानकावर थांबे घेईल.