‘वनराई व जंगले नष्ट करणाऱ्या आगीवर विश्वजित राणे गप्प का?’
पणजी :
गोव्याचे अतिउत्साही मंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यातील वनराई व जंगलातील आगीबाबत पूर्ण मौन बाळगले आहे. त्यांच्या कार्यकाळात पर्यावरण-संवेदनशील आणि हरित भूमी का जळत आहेत, याचे उत्तर ते गोमंतकीयांना देतील का? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली “काँक्रीट जंगल” मंत्री होण्याची त्यांना घाई झालेली दिसते, असा थेट हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी वन व नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्यावर केला आहे.
काणकोण येथील चापोली आणि कुंकळ्ळी मतदारसंघातील पारोडा येथे नुकत्याच लागलेल्या आगीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्षांनी गोव्यातील वनक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत लागलेल्या आगीच्या सर्व घटनांमध्ये विश्वजित राणेंचा हात असल्याचा संशय व्यक्त केला.
विश्वजित राणे यांनी गोव्याचे वन आणि नगर नियोजन मंत्रीपद स्वीकारल्यानंतरच ही आग भडकली हा योगायोग म्हणता येणार नाही. त्यांच्या भूमिकेची तातडीने चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.
त्यांचे मौन जंगल आणि हरित भागात मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीत त्याचा सहभाग सिद्ध करते. गोव्याचे काँक्रीटच्या जंगलात रूपांतर करून गोव्याला उद्ध्वस्त करण्यासाठी ते सर्वस्वी तयार आहेत, असा दावा अमित पाटकर यांनी केला.