‘संजीवनी’ची जमीन रियल इस्टेट माफियांना लाटू देणार नाही : युरी
मडगाव :
संजीवनी साखर कारखाना हा गोव्यातील शेतीला प्रोत्साहन देणारा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांचा दूरदर्शी प्रकल्प होता. आम्ही भाजप सरकारला भाऊसाहेबांचा वारसा नष्ट करून सदर कारखान्याची जमीन रिअल इस्टेट माफियांच्या ताब्यात देऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला.
मी आज मला भेटलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांना त्यांचे प्रश्न आगामी विधानसभेच्या अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी इथेनॉल तयार करणारा कारखाना सुरू करण्याच्या त्यांच्या मागणीचा विचार करावा आणि त्यांची प्रलंबित नुकसानभरपाई त्वरित द्यावी, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
आज गोमंतक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारे निवेदन घेऊन माझी भेट घेतली. धारबांदोडा येथे इथेनॉल प्लांट उभारण्याची त्यांची एक मागणी आहे. ऊस हाच इथेनॉल उत्पादनांत मुख्य घटकांपैकी एक असल्याने सदर कारखान्याच्या स्थापनेने ऊस उत्पादकांना मदत होणार आहे असे त्यांनी मत मांडले. मि त्यांच्या मागणीशी पूर्णपणे सहमत आहे आणि सरकारसमोर त्यांच्या मागणीचे व इतर समस्यांचे सर्वोच्च प्राधान्याने निराकरण करण्याची मागणी करणार आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
भाजप सरकार एकूण १५ लाख चौरस मीटर जमिनीपैकी जवळपास ७ लाख चौरस मीटर जमीन रिअल इस्टेट लॉबीला देण्याचा प्रयत्न करत आहे. या जमिनीवर भाजपचे काही मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा डोळा आहे. ही जमीन शेतकऱ्यांच्या हितासाठीच वापरली जावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या स्वतःच्या आश्वासनावर भाजप सरकारने आता पाठ फिरवली आहे, हे धक्कादायक आहे. एकप्रकारे सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची शेती थांबवण्यासाठी परावृत्त करत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.