चर्चिलच्या जुन्या युद्ध कार्यालयाचे झाले आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर…
लंडन:
हिंदुजा ग्रुप या १०९ वर्षे जुन्या बहुराष्ट्रीय कंपनीने नुकतेच ‘द ओल्ड वॉर ऑफिस’ (OWO) या लंडनच्या प्रीमियर लक्झरी हॉटेलचे उद्घाटन केले. दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी लंडनमधील एका नवीन लक्झरी हॉटेलसाठी दालने खुली केली. या आलिशान कार्यक्रमात एक सरप्राईझ देखील होते. लॉर्ड अँड्र्यू लॉयड वेबर आणि अँड्रिया बोसेली या संगीतकारांचा यावेळी परफॉर्मन्स झाला.
हिंदूजा ग्रुप आणि रॅफल्स हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांच्या समन्वयाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. व्हाईटहॉलच्या मध्यवर्ती भागात या ऐतिहासिक ओल्ड वॉर ऑफिसचे (OWO) उद्घाटन करण्यात आले. हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष जीपी हिंदुजा यांच्यासोबत हॉटेलमध्ये फेरफटका मारल्यानंतर प्रिन्सेस ऍनी – प्रिन्सेस रॉयल, राजा चार्ल्स तृतीयची बहीण यांनी अधिकृतपणे OWO च्या फलकाचे अनावरण केले.
या सोहोळ्याला विविध उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, तसेच मनोरंजन क्षेत्रातील तारे तारकांसह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी देखील हजेरी लावली होती.
भारत आणि ब्रिटनमध्ये काय चांगले करता येईल, यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असतात, असे हिंदुजा ग्रुपचे संचालक जी.पी. हिंदुजा यांनी सांगितले. कारण यजमान देश आणि मातृभूमी यांच्यातील सेतू म्हणून काम करणे ही आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो, असेही ते सांगतात.
या जुन्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूचे एका चांगल्या वास्तूत रूपांतर करण्यासाठी आम्हाला आठ वर्षे लागली. ही प्रतिष्ठित इमारत जागतिक युद्धाच्या नव्हे तर शांततेचे प्रतीक बनली आहे. OWO हॉटेल हिंदुजा समूहाचा वारसा व्यवस्थित चालवेल आणि लंडनचे प्रतिष्ठित ठिकाण म्हणून उदयास येईल. लंडनमध्ये उतरणारा प्रत्येक माणूस प्रथम येथे येईल, असा विश्वासही जीपी हिंदुजा यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहोळ्यात OWO चे शेफ पार्टनर म्हणून 3-मिशेलिन-तारांकित शेफ मौरो कोलाग्रेको यांचे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. हे हॉटेल शुक्रवार, २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
OWO हे ‘रॅफल्स लंडन’ या नावाने अधिकृतपणे ओळखले जाणार आहे. हिंदुजा समूह आणि फ्रेंच बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी ग्रुप Accor यांच्या भागीदारीतून ही वास्तू विकसित करण्यात आली आहे.
“जेव्हा आम्ही व्हाईटहॉलला आलो, तेव्हा या भव्य इमारतीच्या आकाराने आणि सौंदर्याने आमची टीम चकित झाली. त्याचे पूर्वीचे वैभव परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. एक अशी वास्तू जी सार्वकालिक असेल, त्याचे ऐतिहासिक महत्त्व टिकून राहील आणि तिच्या रचनेतून श्रीमंती झळकेल अशी वास्तू उभारण्याचा आमचा प्रयत्न होता, असे संजय हिंदुजा म्हणाले. संजय हिंदुजा यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
OWO च्या भव्य उद्घाटन समारंभात HRH राजकुमारी बीट्रिस, लंडनचे महापौर सादिक खान, ब्रिटिश अभिनेता आणि कॉमेडियन आदिल रे, ब्रिटिश टेलिव्हिजन प्रेझेंटर नताली पिंकमन, ब्रिटिश उद्योगपती रिचर्ड केअरिंग आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल यांच्यासह मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक इमारतीच्या पुनरुज्जीवनाचे साक्षीदार होण्यासाठी राजघराण्यातील इतर उल्लेखनीय व्यक्ती, जागतिक नेते आणि सेलिब्रिटी देखील एकत्र आले.
या हॉटेलच्या उद्घाटनाचा सोहोळा हा नेत्रदीपक म्हणावा असाच होता. आणि जगप्रसिद्ध संगीत आयकॉन अँड्रिया बोसेली आणि लॉर्ड अँड्र्यू लॉयड वेबर यांच्या लाईव्ह कार्यक्रमाने या सोहोळ्यात चार चाँद लावले. तर कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांना OWO येथे रॅफल्स लंडनचे शेफ पार्टनर असलेले 3-मिशेलिन अभिनीत शेफ मौरो कोलाग्रेको यांनी बनवलेल्या चविष्ट पाककृतींचा आस्वाद घेता आला.
नवीन रचना करण्यात आलेल्या या OWO हॉटेलमध्ये नवनवीन चवींचे पदार्थ असतील. यासाठी रॅफल्सने वेगळी व्यवस्था केली आहे. या हॉटेलमध्ये नऊ नवीन रेस्टॉरंट्स आणि तीन बार आहेत. बकिंगहॅम पॅलेसचे विहंगम दृश्य पाहायला मिळावे म्हणून रुफटॉप रेस्टोरंट देखील आहे.