
पणजी: बहुप्रतिक्षित गोवा मराठी चित्रपट महोत्सव यावर्षी आपल्या चौदाव्या आवृत्तीसह पुन्हा एकदा गोव्यात रंगणार आहे. हा दोन दिवसांचा सोहळा ९ व १० ऑगस्ट रोजी पणजी येथील आयनॉक्स चित्रगृह आणि मॅक्विनेझ पॅलेस येथे पार पडणार आहे.या महोत्सवात पंधरा हून अधिक मराठी चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच सादर होणारे चित्रपट, प्रेक्षकप्रिय चित्रपट तसेच गोव्यात प्रथमच दाखवले जाणारे चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मराठी सिनेमहोत्सवाचे उदघाटन ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता आयनॉक्स येथे होणार असून, मराठी सिनेनिर्मितीमध्ये पदार्पण करणारे प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते अक्षय कुमार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना त्यांच्या पाच दशकांहून अधिक काळाच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल महोत्सवात ‘कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी केवळ मराठी रंगभूमी व चित्रसृष्टीतच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अस्तु (२०१३) या दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे ते निर्माता आहेत. तसेच त्यांनी द सी वुल्व्हज (१९८०) या आंतरराष्ट्रीय चित्रपटातही भूमिका साकारली होती, ज्याचे चित्रिकरण गोव्यातच झाले होते.

गोवा मराठी चित्रपट महोत्सव हा देशातील सर्वात मोठा आणि दीर्घकाळ चालणारा मराठी चित्रपट महोत्सव मानला जातो. यंदाही अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग निश्चित झाला आहे.प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, किशोर कदम, मिलिंद शिंदे, जितेंद्र जोशी, रोहिणी हट्टंगडी, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, ओम भुतकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, निकिता दत्ता, अमृता सुभाष यांच्यासह अनेक कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शक देखील उपस्थित राहणार आहेत.



“गोव्यातील रसिक प्रेक्षकांना विविध विषयांवर आधारित उत्कृष्ट मराठी चित्रपट दाखवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. केवळ चित्रपट दाखवणे नव्हे, तर प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांशी संवाद साधण्याची संधी देणे हाच GMFF चा खरा आत्मा आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी मराठी चित्रसृष्टीतही विशेष उत्साह असल्याचे महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी नमूद केले.
युवा गोयंकारांचे दोन लघुपट दाखवणार
यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात गोमंतकीय युवा सिनेकर्मीनी निर्माण केलेले दोन लघुपट दाखवण्यात येतील. वास्को येथील शर्व शेट्ये यांनी निर्माण केलेला ‘कर्ज’ हा हिंदी लघुपट तसेच गेल्या वर्षी इफ्फीत प्रदर्शित झालेला किशोर अर्जुन दिग्दर्शित ‘एक कप च्या’ हा कोंकणी लघुपट प्रदर्शित केला जाईल.
प्रत्यक्ष नोंदणीसाठी खालील ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे (२० जुलैपासून):



