
पणजी :
प्रसिद्ध कवी आणि ललित लेखक उदय म्हांबरे यांच्या आत्मपर आठवणी असलेल्या ‘काळीज उसवलां’ या कोंकणी पुस्तकाला आणि साहित्य अकादमी प्राप्त केरळ येथील कोंकणी कवी आर एस भास्कर यांच्या ‘चैत्रपालवी’ या काव्यसंग्रहाला मंगळूर येथील डॉ. टि.एम. ए. पै फाऊंडेशनचा 2023 वर्षासाठीचे ‘साहित्य प्रशंसा’ पुरस्कार जाहिर झाले आहेत. प्रत्येकी दहा हजार रुपये, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
कोंकणी भाषेचे महत्वाचे कवी आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदय म्हांबरे यांच्या ‘काळीज उसवलां’ या पुस्तकाने प्रकाशनापासूनच वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याचसोबत विविध मान्यवर संस्थांच्या पुरस्कारांवर देखील या पुस्तकाने आपली मोहोर उमटवली आहे, कोंकणी भाशा मंडळाचा रमेश वेळुस्कार स्मृती पुरस्कार गेल्या वर्षी जाहीर झाला आहे. तर केरळ मध्ये कोंकणी साहित्यातील महत्वाचे नाव असलेल्या आर एस भास्कर यांना साहित्य अकादमी पासून देशभरातील महत्वाचे विविध पुरस्कार प्राप्त झाले असून, चैत्रपालवी हा त्यांचा नवीन काव्यसंग्रह प्रसिद्धीपासूनच गाजतो आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने लेखक उदय म्हांबरे यांनी सांगितले की, ‘माझ्या बालपणीच्या आठवणी वाचकांना आजही आपल्याशा वाटतात, जवळच्या वाटतात, वाचाव्याशा वाटतात याचे मलादेखील कौतुक आणि आनंद आहे. डॉ टी एम ए पै प्रशंसा पुरस्कार या मानाच्या पुरस्कार या पुस्तकाला जाहीर झाल्याचा आनंद माझ्यासाठीही विशेष आहे. यानिमित्ताने मी वाचकांचा आणि संस्थेचा आभारी आहे.’
दरम्यान, काळीज उसवलां या पुस्तकावर लिहिलेल्या विविध समिक्षात्मक लेख व वाचकांच्या प्रतिक्रियांचे काशिनाथ नायक यांनी संपादन केलेलॆ ‘काळीज उसवलां – म्हजे नदरेंतल्यान’ हे पुस्तक नुकतेच संजना पब्लीकेशन्सने प्रसिद्ध केले आहे. तर, ‘काळीज उसवलां’ पुस्तकाचा मल्याळम भाषेतील अनुवाद यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोची येथे केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. आणि ‘सहित प्रकाशन’च्या वतीने मराठी अनुवाद यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होत आहे.