“हौशी सत्ताधीश नव्हे, खरे जनसेवक पाहिजे”; सटाण्यातील नागरिकांचा जाहीरनामा चर्चेत…
सटाणा: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील सजग नागरिकांनी एकत्र येत आपला ‘नागरिकांचा मागणी-जाहीरनामा’ जाहीर केला आहे. निवडणूक प्रचारास प्रारंभ झालेला असतानाच या जाहीरनाम्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. “उमेदवारांनी आमच्या मागण्यांना बांधील राहावे, त्यासाठी त्यांनी सामुदायिक शपथपत्र द्यावे; त्यानंतरच आम्ही मतदान करू,” असा ठाम सूर या जाहीरनाम्यातून नोंदवण्यात आला आहे.
प्रसिद्ध लेखक डॉ. सुधीर रा. देवरे यांच्या पुढाकाराने हा जाहीरनामा तयार करण्यात आला असून शहरातील रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे की, “कोणताही उमेदवार निवडण्याआधी त्याने या मागण्यांवर सामुदायिक शपथपत्र द्यावे.”
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषदेकडून मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे सटाणा शहराचा विकास ठप्प झाल्याची नाराजी वाढत आहे. हीच नाराजी संघटित पद्धतीने नोंदवत शहरातील प्रबुद्ध नागरिकांनी अकरा प्रमुख मागण्यांचा घोष केला आहे.
नागरिकांच्या महत्त्वाच्या मागण्या
१. अन्यायकारक घरपट्टीवाढ रद्द करणे:
नागरिकांनी अवास्तव वाढ झालेली घरपट्टी तात्काळ रद्द करावी, तसेच समान मालमत्ता–समान कर हा धोरणात्मक मार्ग स्वीकारावा, अशी मागणी केली आहे.
२. शहराला “प्राणीमुक्त–कचरामुक्त” करण्याची मागणी:
शहरभर फिरणारी डुक्करे, गाई–म्हशी, कुत्री, तसेच आता वाढलेली गाढवांची संख्या नियंत्रणात आणून सटाणा शहर पूर्णतः स्वच्छ व सुरक्षित करावे, असे नागरिकांचे प्रतिपादन आहे. डासमुक्ती आणि कचरामुक्तीची कडक अंमलबजावणीही यामध्ये समाविष्ट आहे.
३. अतिक्रमण निर्मूलन:
मुख्य रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक जागांवरील सर्व अतिक्रमणे हटवून वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
४. आरोग्यसुविधा:
नागरिकांच्या आरोग्यासंबंधी विशेष सुविधा, आपत्कालीन उपचार केंद्रे, स्वच्छता अभियान यावर भर देण्याची सूचना केली आहे.
५. दर्जेदार रस्ते:
काही महिन्यांत उखडणाऱ्या रस्त्यांऐवजी किमान १० वर्षे टिकणारे दर्जेदार, शाश्वत रस्ते बांधण्याची मागणी यामध्ये स्पष्ट केली आहे.
६. आरम नदी प्रदूषणमुक्त करणे:
नदीच्या दोन्ही तीरांवर वृक्षलागवड, नदीतील प्रदूषणावर नियंत्रण आणि बंधाऱ्यांची उभारणी यांसाठी ठोस योजना राबवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
७. शंभर वर्षे टिकणाऱ्या भुयारी गटारी:
सध्याच्या निकृष्ट गटारव्यवस्थेऐवजी टिकाऊ, सुरक्षित आणि पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीच्या भुयारी गटारींची उभारणी करावी.
८. सर्व सार्वजनिक जागा मुक्त करणे:
शहरातील राखीव भूखंड, ओपन स्पेस नागरिकांसाठी मुक्त करून खेळाची मैदाने, उद्याने व सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
९. दर्जेदार संदर्भ ग्रंथालय:
विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी व नागरिकांसाठी सुसज्ज संदर्भ ग्रंथालय उभारण्याची मागणी पहिल्यांदाच इतक्या जोरात पुढे आली आहे.
१०. स्ट्रीट लाईट व्यवस्था:
शहरातील प्रत्येक घर रात्री प्रकाशझोतात यावे, अशी पूर्ण स्ट्रीट लाईट दुरुस्ती व विस्ताराची मागणी करण्यात आली.
११. बायपास / रिंगरोड:
वाढत्या वाहतुकीसाठी तातडीने बायपास/रिंगरोड पूर्ण करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे.
या जाहीरनाम्याच्या अखेरीस, “आम्हाला हौशी सत्ताधीश नकोत, जनसेवक पाहिजेत,” असा स्पष्ट संदेश उमेदवारांना देण्यात आला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, शेतकरी, महिला व युवक यांच्या संयुक्त स्वाक्षऱ्यांनी हा जाहीरनामा अधिक बळकट झाला आहे.



