गोवा

”नक्शा’ सर्व्हेसंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण’

नागरिकांनी जागरूक राहण्याचे प्रभाव नायक यांचे आवाहन

मडगांव: गोव्यात राबविण्यात येत असलेल्या ‘नक्शा’ (NAKSHA) सर्व्हेच्या अंमलबजावणीबाबत मडगांवचो आवाज आणि युवक नेते प्रभव नायक यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा सर्व्हे केवळ शहरी भागांसाठी असताना तो गोव्यातील गावांमध्ये राबविला जात असून त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,” असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

मडगांव परिसरातील दवर्ली, नावेली, नुवें, राय, सुरावली तसेच कुंकळ्ळी परिसरातील वेरोडा, आंबेलीम आणि पणजी परिसरातील ताळगांव, सांताक्रूझ, बांबोळी व इतर गावांचा ‘नक्शा’ सर्व्हेमध्ये जनतेला केवळ २४ तासांची सूचना देऊन समावेश करण्यात आला आहे. इतक्या अल्प सूचनेमुळे लोकसहभागाला तडा जात असून जमीन व निवास हक्कांवर परिणाम होणाऱ्या या प्रक्रियेच्या उद्देशावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे प्रभव नायक म्हणाले.

याबाबत अधिक चिंता व्यक्त करताना प्रभव नायक यांनी सांगितले की, संबंधित खात्याच्या संचलकांनी स्वतः मान्य केले आहे की मडगांव, कुंकळ्ळी व पणजी ही शहरेदेखील केंद्र सरकारच्या ‘नक्शा’ योजनेच्या निकषांत बसत नाहीत. असे असतानाही आजूबाजूच्या गावांचा सदर सर्व्हेत समावेश करण्यात आला असून, यामागे प्रक्रियात्मक अनियमितता व योजनेच्या उद्दिष्टांमध्ये फेरफार केल्याचा संशय निर्माण होत आहे.

मडगांवचो आवाज आणि युवक नेते प्रभव नायक यांनी इशारा दिला की, योजनेच्या निकषांत न बसणाऱ्या भागांमध्ये सर्व्हे राबविल्यास शहरी मॅपिंगसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर किंवा अपहार होण्याची गंभीर शक्यता आहे. केंद्र सरकारच्या निधीचा मार्गदर्शक तत्त्वांबाहेर वापर होणे हे आर्थिक नियमांचे उल्लंघन असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली.

गोव्यातील गावे ही कोमुनिदाद, मुंडकार हक्क, भाडेकरू कायदे व दीर्घकालीन पारंपरिक जमिनीच्या वापरावर आधारित गुंतागुंतीच्या कायदेशीर चौकटीत वसली आहेत. पारदर्शकता नसलेला किंवा दोषपूर्ण सर्व्हे जमीन नोंदी बिघडवू शकतो, बेकायदेशीर बांधकामांना वैधता देऊ शकतो आणि अनियंत्रित शहरीकरणाला चालना देऊ शकतो, ज्यामुळे गोव्यातील निसर्गसंपन्न गावे काँक्रीटच्या जंगलात बदलण्याचा धोका आहे, असा इशाराही प्रभव नायक यांनी दिला.

मडगांवचो आवाजने सरकारकडे मागणी केली आहे की, अपात्र भागांतील ‘नक्शा’ सर्व्हे तात्काळ थांबवावा, पात्रतेचे निकष, मंजुरी व निधी वापराचा तपशील सार्वजनिक करावा आणि पुढील कारवाईपूर्वी गावपातळीवर सल्लामसलत करावी. पारदर्शकता, जबाबदारी व पारंपरिक हक्कांचे संरक्षण सुनिश्चित न केल्यास, गोव्याच्या गावांच्या रक्षणासाठी जनतेला विरोधाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे प्रभव नायक यांनी नमूद केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!