एलआयसी प्रिमीयम झाला निम्म्याने कमी
मुंबई :
एलआयसीच्या समभाग खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी प्रचंड गर्दी केली असली तर ग्रे मार्केटमधील तेजी ओसरली आहे. एलआयसीचा प्रिमीयम निम्म्याने कमी झाला आहे. शुक्रवारी ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचा शेअर प्रिमीयम ४२ रुपयांपर्यंत खाली आला आहे. भांडवली बाजारात झालेल्या प्रचंड घसरणीचे पडसाद ग्रे मार्केटमध्ये उमटल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आयपीओची घोषणा झाल्यानंतर चार दिवसात एलआयसीच्या शेअर प्रिमीयममध्ये पाच पटीने वाढ झाली होती. सोमवारी २ मे २०२२ रोजी एलआयसीचा ग्रे मार्केटमधील प्रति शेअर प्रिमियम ८५ रुपयांवर इतका वाढला होता. दररोज प्रिमीयम वाढत असल्याने शेअरची बंपर लिस्टींग होईल, असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र मागील दोन दिवसांत प्रिमीयममध्ये घसरण झाली आहे.
एलआयसीच्या शेअरची मागणी आयपीओच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५ मे २०२२ रोजी पूर्ण झाली. आज तिसऱ्या दिवशी शुक्रवारी आयपीओ १.१७ पटीने सबस्काईब झाला आहे. त्यात क्यूआयबीचा कोटा ४१ टक्के, एचएनआय ५७ टक्के सबस्क्राईब झाला आहे. रिटेलसाठीचा राखीव कोटा २.६५ पटीने आणि पाॅलिसीधारकांसाठीचा कोटा ३.५६ पटीने सबस्क्राईब झाला आहे.
एलआयसीच्या एका समभागाच्या खरेदीसाठी ९०२ रुपये ते ९४९ रुपये हा दरपट्टा आहे. एलआयसी पाॅलिसीधारकांना या भागखरेदीवर ६० रुपये प्रतिसमभाग सवलत अन्य वैयक्तिक गुंतवणूकदारांना ४५ रुपये सवलत जाहीर करण्यात आला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांकरिता ९ मे २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.