देश/जग

अण्णामलाई यांनी दिला भाजपचा राजीनामा

नवी दिल्ली/चेन्नई :

तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर त्यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

सूत्रांच्या माहितीनुसार, अण्णामलाई यांनी पक्ष नेतृत्वाला आपला निर्णय लेखी स्वरूपात कळविला आहे. तामिळनाडूमधील पक्षाच्या भविष्यातील राजकीय धोरणांबाबत आणि संघटनात्मक घडामोडींविषयी त्यांनी नेतृत्वाशी चर्चा केल्याचे सांगितले जाते.

गेल्या काही आठवड्यांपासून अण्णामलाई यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. तामिळनाडू भाजपच्या नेतृत्वातील बदल आणि राज्यातील आघाडीच्या राजकारणावरून मतभेद असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

दरम्यान, अण्णामलाई स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या काही माध्यमांतून समोर आल्या आहेत. मात्र, यासंदर्भात त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

अण्णामलाई यांच्या राजीनाम्याबाबत भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे तामिळनाडूसह राष्ट्रीय राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!