गोवा

क्रांती दिनी होणार काँग्रेसच्या नव्या अभियानाची सुरुवात

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समिती (जीपीसीसी) १८ जूनच्या क्रांती दिनानिमित्त नव्या राजकीय आणि संघटनात्मक अभियानाची सुरुवात करणार असून, यावेळी पक्षाची भावी रणनीती जाहीर केली जाणार आहे. तसेच संघटनात्मक पुनर्रचनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले जाणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली.

पणजी येथील काँग्रेस भवनात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पक्षातील अंतर्गत चर्चा आणि मतभेद सौहार्दपूर्ण वातावरणात निकाली निघाले असून काँग्रेस आता संघटन बळकटीकरणावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनात्मक पुनर्रचनेअंतर्गत प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी आणि विविध समित्यांची नव्याने घोषणा लवकरच केली जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यभर जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गिरीश चोडणकर यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यातील कथित कुशासन, भ्रष्टाचार आणि जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसची भूमिका अधिक ठामपणे मांडली जाईल, असे ते म्हणाले.

डॉ. अंजली निंबाळकर यांनी संघटनात्मक बदल ही कोणत्याही राजकीय पक्षातील नियमित प्रक्रिया असल्याचे सांगत, पक्षहित आणि संघटन बळकटीकरण लक्षात घेऊन सर्व निर्णय सामूहिकपणे घेतले जातील, असे स्पष्ट केले.

गोव्यातील आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस अधिक सक्षम आणि एकसंघ होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!