
डीपफेकविरोधात प्रीती झिंटाची न्यायालयात धाव
मुंबई : अभिनेत्री प्रीती झिंटा हिने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कथित डीपफेक व्हिडीओ, छायाचित्रे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी गुगल, मेटा आणि अन्य संबंधित संस्थांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मिळवली आहे.
झिंटा हिने दाखल केलेल्या याचिकेत तिच्या चेहऱ्याचा, नावाचा आणि ओळखीचा वापर करून तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडीओ, छेडछाड केलेली छायाचित्रे, मीम्स तसेच चॅटबॉट व्यक्तिमत्त्वे विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे तिच्या प्रतिमेला धक्का पोहोचल्याबरोबरच व्यक्तिमत्त्व हक्क, कॉपीराइट आणि नैतिक हक्कांचे उल्लंघन झाल्याचा दावा तिने केला आहे.
या प्रकरणात तिची व्यावसायिक कारकीर्द, प्रतिष्ठा आणि सामाजिक ओळख यांचा केंद्रबिंदू मुंबई असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानंतर उच्च न्यायालयाने तिला दावा दाखल करण्यासाठी आवश्यक परवानगी दिली.
डीपफेक सामग्री प्रसारित होण्यास प्रतिबंध घालणे, संबंधित सामग्री हटविण्याचे निर्देश देणे तसेच इतर कायदेशीर दिलासे मिळावेत, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावरील पुढील सुनावणी स्वतंत्रपणे होणार असून, एआयच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणाऱ्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या प्रश्नांकडे या खटल्यामुळे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.




