
पद्मश्री प्रसाद सावकार यांचे निधन; संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला
पणजी : मराठी संगीत रंगभूमी आणि शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक-अभिनेते, पद्मश्री प्रसाद सावकार यांचे बुधवारी दुपारी कारंजाळे-टोंक येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकांच्या सुवर्ण परंपरेतील एक मानबिंदू हरपल्याची भावना कला व सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
प्रसाद सावकार हे मराठी संगीत रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि मान्यवर कलाकार म्हणून ओळखले जात होते. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘मानापमान’ यांसारख्या गाजलेल्या संगीत नाटकांतील त्यांच्या भूमिका आणि गायन रसिकांच्या स्मरणात कायम राहिले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
गोव्याशी घट्ट नाळ जोडलेल्या सावकार यांनी अनेक दशकांपर्यंत संगीत रंगभूमीची परंपरा जिवंत ठेवली. त्यांच्या ‘घेई छंद मकरंद’, ‘योगी पावन मनाचा’ यांसारख्या नाट्यगीतांनी रसिकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले.
त्यांच्या निधनाबद्दल कला, साहित्य, संगीत आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, गोवा तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक जग एका दिग्गज कलाकाराला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.






