
शिवसेना खासदारांना फुटीसाठी १५ कोटींची ऑफर?; संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आले असताना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बुधवारी गंभीर आरोप केला. पक्षाच्या खासदारांना गटबाजी घडवून आणण्यासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देण्याची तयारी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
राऊत यांनी दावा केला की, पक्षातील खासदारांना फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रलोभने दिली जात आहेत. त्यांच्या मते, एका खासदारासाठी ५० कोटी रुपयांपर्यंतचा ‘भाव’ ठरविण्यात आला असून १५ कोटी रुपये ही त्यातील आगाऊ रक्कम आहे.
दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील पक्षनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत कोणत्याही संभाव्य फुटीर गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे.
पक्षातील संभाव्य असंतोष आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली होती. पक्षाकडून सर्व खासदार नेतृत्वासोबत असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी फुटीच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.







