अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

आता फोनवर कॉल करणाऱ्याचे नाव दिसणार…

अनोळखी क्रमांकांवरून येणारे कॉल ओळखणे होणार सोपे

नवी दिल्ली : मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी कॉलच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या फोनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दाखवणारी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. ‘कॉलर नेम प्रेझेंटेशन’ (CNAP) असे या सुविधेचे नाव आहे.

या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक संपर्क यादीत सेव्ह नसला, तरी कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव फोनच्या स्क्रीनवर दिसू शकेल. ऑनलाइन फसवणूक, बनावट फोन कॉल आणि ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या प्रकारांमध्ये अनोळखी व्यक्तींकडून नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा महत्त्वाची मानली जात आहे.

नवी सुविधा कशी काम करणार?

CNAP सुविधेसाठी ग्राहकांना स्वतंत्र अर्ज करण्याची किंवा विनंती करण्याची आवश्यकता नसेल. कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या दूरसंचार कंपनीकडे उपलब्ध असलेल्या ग्राहक नोंदणीतील नावाच्या आधारे कॉल प्राप्त करणाऱ्याच्या मोबाईल स्क्रीनवर नाव दिसेल.

संबंधित क्रमांक आधीच मोबाईलमध्ये सेव्ह असेल, तर सध्या जसे नाव दिसते, तसेच दिसेल. मात्र, क्रमांक सेव्ह नसेल, तर दूरसंचार कंपनीच्या नोंदीतील नाव स्क्रीनवर दिसणार आहे. परदेशातून येणाऱ्या कॉलसाठी ‘इंटरनॅशनल कॉल’ असा उल्लेख दिसेल.

सुरुवातीला ४जी नेटवर्कवर सुविधा

प्रारंभी किमान ४जी नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. २जी, ३जी नेटवर्क आणि लँडलाइन सेवांसाठी तिची अंमलबजावणी करण्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाणार आहे.

व्यावसायिक ग्राहकांना नोंदणीकृत नावाऐवजी मान्यताप्राप्त व्यावसायिक नाव दाखवण्याची सुविधाही मिळू शकते. त्यासाठी ट्रेडमार्क नोंदणी किंवा वस्तू व सेवा कर (GST) पोर्टलवरील नोंदींसारख्या संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

गोपनीयतेसाठी उपाययोजना

ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. कॉल संपल्यानंतर कॉल करणाऱ्याच्या नावाची ओळख दर्शवणारी माहिती साठवून ठेवता येणार नाही. तसेच, ‘कॉलर लाइन आयडेंटिफिकेशन रिस्ट्रिक्शन’ (CLIR) सुविधा सक्रिय केलेल्या ग्राहकांचे नाव या प्रणालीत दाखवले जाणार नाही.

नव्या सुविधेमुळे अनोळखी कॉल ओळखणे सोपे होण्याची अपेक्षा असली, तरी केवळ नाव दिसते म्हणून कॉल सुरक्षित आहे, असे समजणे योग्य ठरणार नाही. नागरिकांनी ओटीपी, बँक खात्याचे तपशील, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती फोनवर कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!