
Saif Ali Khan: ‘दरोडेखोराने १ कोटी रुपये मागितले’
Saif Ali Khan Attack updates : अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या मुंबईतील घरी धक्कादायक घटना घडली. गुरुवारी मध्यरात्री एक दरोडेखोर त्यांच्या घरात शिरला. या दरोडेखोराने हल्ला केल्यामुळे सैफ अली खान व घरातील एक मदतनीस जखमी झाले. या दरोडेखोराचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या दरोडेखोराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.
अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी गुरुवारी एक दरोडेखोर शिरला. त्याने घरातील मदतनीसला धमकी देऊन एक कोटी रुपयांची मागणी केली. हा गोंधळ ऐकून सैफ अली खान खोलीत धावला आणि हल्लेखोराशी झालेल्या झटापटीत तो जखमी झाला, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका आलिशान इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील सैफच्या अपार्टमेंटमध्ये रात्री उशिरा ही घटना घडली.
पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, सैफ अली खानच्या घरातील मदतनीस महिलेला बाथरूमजवळ एक सावली दिसली. सुरुवातीला तिला वाटलं की करीना कपूर तिच्या धाकट्या मुलाला बघायला आली आहे, पण नंतर तिला संशय आला आणि ती चौकशीसाठी जवळ गेली. अचानक ३५ ते ४० वयोगटातील या व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला आणि तिला धारदार शस्त्राने धमकावत गप्प राहायला सांगितलं. त्यावेळी तिथे दुसरी मदतनीस आली. त्या दोघींनी त्याला काय हवंय, असं विचारलं असता त्याने एक कोटी रुपये मागितले.
हा गोंधळ ऐकून सैफ अली खान आपल्या खोलीतून खाली आला. त्यानंतर सैफ व दरोडेखोरात झटापट झाली. याचदरम्यान सैफच्या शरीरावर सहा वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या. त्याने वार इतके निर्घृणपणे केले की चाकूचे टोक सैफच्या मणक्यात घुसले होते. सैफला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यावेळी ड्रायव्हर उपलब्ध नव्हता, त्यामुळे कुटुंबियांनी लगेच त्याचा मुलगा इब्राहिम अली खान याला मदतीसाठी बोलावलं. इब्राहिम, त्याची बहीण सारा अली खान दोघेही आठव्या मजल्यावर राहतात, ते लगेच तिथे गेले, त्यांना कार ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कार चालवता येत नव्हती, त्यामुळे त्यांनी सैफला रिक्षातून लीलावती हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले.