
दैवज्ञ समाज, मडगावतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
मडगाव : दैवज्ञ समाज, मडगावतर्फे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी दैवज्ञ भवन, मडगाव येथे उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. दैवज्ञ समाज, मडगावचे अध्यक्ष रामाकांत रायकर यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत पालकांनी मुलांच्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. वेंकटेश रायकर, संचालक, केएलई हुबळी आणि संजय घोडावत विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्याचा सल्ला दिला. तसेच यूपीएससीसह विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन केले. महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेची विश्वासार्हता आणि गुणवत्ता तपासूनच निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला.
यावेळी दहावी परीक्षेत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या समाजातील सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय मार्सेल येथील योगानंद नागवेंकर यांना ‘ज्ञानेश्वरी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नुकतीच एमबीबीएस पदवी पूर्ण केलेल्या डॉ. स्वराली भास्कर वर्लेकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये एकूण गुणवत्ता यादीत कांती दीपक नागवेकर, मिनिषा समीर लोटलीकर आणि अध्विका गुरुनाथ शिरोडकर यांचा गौरव करण्यात आला. विज्ञान शाखेत श्रेया महाबळेश्वर रिवणकर, हर्ष लक्ष्मण चोडणकर आणि तनिष्का सुभाष कोळवेकर, कला शाखेत तेजल संतोष वेर्णेकर, आयुषी जितेंद्र लोटलीकर आणि प्रेरणा दीपक शिरोडकर, तर वाणिज्य शाखेत ईशा नरेंद्र वर्नेकर आणि अवनी लोटलीकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती आशिष नागवेकर यांनी केले. शिक्षण कक्षाचे समन्वयक प्रशिल सालकर यांनी उपेंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले. अखेरीस दैवज्ञ समाजाचे सचिव रोहित वेर्णेकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.





