अर्थमत/ टेक्नॉलॉजी

मोलबायो डायग्नॉस्टिक्सचा आयपीओ १० ऑगस्टपासून

पणजी : गोव्यातील हेल्थ-टेक कंपनी मोलबायो डायग्नॉस्टिक्स लिमिटेडचा प्राथमिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) १० ऑगस्ट रोजी खुला होणार असून १२ ऑगस्टपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे. कंपनीने प्रति समभाग ७६८ ते ८०७ रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून, नव्या समभागांच्या विक्रीतून २०० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या निधीचा प्रामुख्याने संशोधन आणि विकास तसेच गोव्यातील उत्पादन सुविधांच्या विस्तारासाठी वापर केला जाणार आहे.


आयपीओअंतर्गत प्रत्येकी एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या समभागांसाठी किमान १८ समभागांची बोली लावावी लागणार आहे. त्यानंतर १८ समभागांच्या पटीत बोली लावता येईल. प्रमुख (अँकर) गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.


कंपनीने पात्र कर्मचाऱ्यांसाठी दीड कोटी रुपयांपर्यंतचे समभाग राखीव ठेवले असून त्यांना प्रति समभाग ७६ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. कंपनीकडे सध्या १,२२५ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यापैकी अनेक जण गोव्यात कार्यरत आहेत.


गोव्यात दोन उत्पादन प्रकल्प

२००० मध्ये स्थापन झालेल्या मोलबायो डायग्नॉस्टिक्सचे मुख्यालय व्हेर्ना औद्योगिक वसाहतीत आहे. कंपनीचे व्हेर्ना येथे दोन प्रमुख उत्पादन प्रकल्प असून नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयही येथेच आहे. कंपनीने आतापर्यंत ९० देशांमध्ये १२,५०० हून अधिक उपकरणांची विक्री केल्याचा दावा केला आहे.


मोलबायोने विकसित केलेला ‘Truenat’ हा कंपनीचा प्रमुख मॉलिक्युलर डायग्नोस्टिक प्लॅटफॉर्म आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या पोर्टेबल रिअल-टाइम पीसीआर प्रणालीमुळे प्रयोगशाळेबाहेरही विविध संसर्गजन्य आजारांचे निदान करणे शक्य होते. क्षयरोगाच्या (टीबी) प्राथमिक निदानासाठी आणि औषध प्रतिकार शोधण्यासाठी या तंत्रज्ञानाला जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) मान्यता मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.


संशोधन, स्वयंचलनासाठी निधी

आयपीओतील नव्या समभागांच्या विक्रीतून मिळणाऱ्या २०० कोटी रुपयांच्या निधीचा काही भाग नवीन संशोधन केंद्र आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्हेर्ना येथील युनिट-१ आणि युनिट-२ मध्ये उत्पादन प्रक्रिया अधिक स्वयंचलित करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

आयपीओनंतर कंपनीचे समभाग राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजारात (BSE) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!