देश/जग

‘वंदे मातरम्’वरून काँग्रेसवर विजययन यांचा निशाणा

तिरुवनंतपुरम : काँग्रेसच्या दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) मुख्यालयासह काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील स्वातंत्र्यदिनाच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची पूर्ण आवृत्ती सादर करण्यात आल्यावरून केरळचे माजी मुख्यमंत्री आणि माकपचे ज्येष्ठ नेते पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा हा निर्णय म्हणजे पक्षाच्या ‘मृदू हिंदुत्वा’च्या भूमिकेचे आणखी एक उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला.


केरळमधील वन विभागाच्या मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही ‘वंदे मातरम्’ची पूर्ण आवृत्ती सादर करण्यात आल्याचा दावा विजयन यांनी केला आहे. काँग्रेसची बांधिलकी भारताच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाशी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) हिंदुत्वाच्या अजेंड्याशी असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


विजयन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काँग्रेसच्या ऐतिहासिक भूमिकेचाही संदर्भ दिला आहे. ‘वंदे मातरम्’मधील धार्मिक प्रतिमा बहुविध भारतीय समाजाला स्वीकारार्ह नसल्याने १९३७ मध्ये काँग्रेस कार्यसमितीने राष्ट्रीय चळवळीच्या कार्यक्रमांमध्ये या गीताच्या केवळ पहिल्या दोन कडव्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा त्यांनी केला. १९५० मध्ये संविधान सभेने ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देताना पहिल्या दोन कडव्यांनाच अभिप्रेत मानले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.


‘स्वतःचीच धर्मनिरपेक्ष परंपरा काँग्रेसने सोडली

‘वंदे मातरम्’ची संपूर्ण आवृत्ती गाऊन काँग्रेसने आपलीच धर्मनिरपेक्ष परंपरा कचरापेटीत टाकली आहे, अशी टीका विजयन यांनी केली. यापूर्वीच्या यूडीएफ सरकारच्या शपथविधी समारंभातही ‘वंदे मातरम्’ची पूर्ण आवृत्ती सादर करण्यात आली होती, असा उल्लेख त्यांनी केला.


सर्वोच्च न्यायालयाच्या मार्च २०२६ मधील ‘मोहम्मद सईद नूरी विरुद्ध भारत सरकार’ प्रकरणाचाही विजयन यांनी दाखला दिला. या प्रकरणात न्यायालयाने केंद्राच्या २८ जानेवारी २०२६ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणारी याचिका फेटाळताना ‘वंदे मातरम्’ गाणे अनिवार्य करणारी दंडात्मक तरतूद या सूचनांमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. न्यायालयाने याचिका ‘वेळेआधी दाखल केलेली’ असल्याचेही म्हटले होते.


केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘वंदे मातरम्’च्या सहा कडव्यांची पूर्ण आवृत्ती अधिकृत कार्यक्रमांमध्ये सादर करण्याबाबत प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला आहे. आकाशवाणीनेही मार्च २०२६पासून सहा कडव्यांची आवृत्ती प्रसारित करण्यास सुरुवात केली.


या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कोणतीही कायदेशीर सक्ती नसतानाही आरएसएसच्या भूमिकेच्या दबावाखाली ‘वंदे मातरम्’ची पूर्ण आवृत्ती सादर केल्याचा आरोप विजयन यांनी केला. बहुसंख्याकांच्या धार्मिक राष्ट्रवादाशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेस संघ परिवाराच्या अजेंड्याचे अनुकरण करत असल्याचे सांगत, ‘काँग्रेस आरएसएसची बी-टीम बनल्याचे हे ताजे उदाहरण आहे,’ अशी तीव्र टीकाही त्यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!