
पणजी : राज्यात २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) गोवा विभागासाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. गोवा मनोरंजन संस्थेतर्फे (ईएसजी) आयोजित करण्यात येणाऱ्या या विभागात निवडक गोमंतकीय फिचर आणि नॉन-फिचर चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर आहे.
या विभागात ‘गोवन डायरेक्टर्स कट’ या उपविभागाचा समावेश असून, गोमंतकीय दिग्दर्शकांना आपले चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. गोमंतकीय निर्मात्यांसाठी स्वतंत्र उपविभागही ठेवण्यात आला आहे. या दोन्ही उपविभागांसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
निर्माता उपविभागासाठी फिचर किंवा नॉन-फिचर चित्रपट पाठवता येतील. यासाठी चित्रपटाचा निर्माता गोमंतकीय असणे आवश्यक आहे. फिचर चित्रपट मराठी किंवा कोकणी भाषेतील असावा. नॉन-फिचर चित्रपट मराठी, कोकणी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील असू शकतो.
सेन्सॉर प्रमाणपत्राची अट
प्रवेशिकेसाठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, प्रमाणपत्र नसलेला चित्रपट १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तयार झालेला असणे आवश्यक आहे.
फिचर चित्रपटाची लांबी ७० मिनिटे, तर नॉन-फिचर चित्रपटाची लांबी १० ते ७० मिनिटांदरम्यान असावी. फिचर चित्रपटासाठी ५ हजार रुपये, तर नॉन-फिचर चित्रपटासाठी २ हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.
प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून तीन सदस्यीय परीक्षक मंडळाकडून अंतिम चित्रपटांची निवड केली जाणार आहे. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील आणि त्याविरोधात कोणताही दावा करता येणार नसल्याचे ईएसजीने स्पष्ट केले आहे.
प्रवेशिका आणि अर्ज प्रक्रियेची माहिती ईएसजीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.







