अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘या’ शहरात होणार एअर इंडियाची फ्लाइंग अकादमी

मुंबई : भारतातील वैमानिक प्रशिक्षण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने एअर इंडियाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथील बेलोरा विमानतळावर सुरू करण्यात येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइंग अकादमीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाली आहे. भारतीय विमान कंपनीने स्वतः स्थापन केलेली ही देशातील पहिली फ्लाइंग अकादमी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या अकादमीमध्ये वैमानिक प्रशिक्षणासाठी ३१ सिंगल-इंजिन आणि तीन ट्विन-इंजिन विमानांचा ताफा उपलब्ध असेल. सुमारे १० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रात डिजिटल सुविधांनी सुसज्ज वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था, डिजिटल ऑपरेशन्स सेंटर आणि स्वतंत्र विमान देखभाल सुविधा असतील. या सुविधांमुळे प्रशिक्षणार्थींना आधुनिक पायाभूत सुविधांसह वैमानिक प्रशिक्षण घेता येणार आहे.

देशातील विमान वाहतूक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ आणि प्रशिक्षणविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या एअर इंडियाच्या व्यापक योजनेचा हा भाग आहे. या योजनेअंतर्गत गुरुग्राम येथे सहा लाख चौरस फुटांच्या क्षेत्रावर विमान वाहतूक प्रशिक्षण अकादमीही उभारण्यात आली आहे. ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी विमान वाहतूक प्रशिक्षण संस्था असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

भारतात हवाई प्रवासाची मागणी वाढत असताना वैमानिकांची गरजही वाढत आहे. अमरावती आणि गुरुग्राम येथील प्रशिक्षण सुविधांमधील गुंतवणुकीमुळे ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित वैमानिक उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच देशातील विमान वाहतूक क्षेत्राची स्वयंपूर्णता वाढविण्यास हातभार लागेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!