सिनेनामा 

IFFI 2026: इफ्फीमध्ये ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

‘धुरंधर’ने होणार भारतीय पॅनोरमाचा प्रारंभ; ‘रामायण’ ब्रिक्स विभागाचा उद्घाटनपट

 

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ५७ व्या पर्वात यंदा जगभरातील ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी चित्रपटप्रेमींना अनुभवता येणार आहे. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात होणाऱ्या या महोत्सवात रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ हा भारतीय पॅनोरमा विभागाचा उद्घाटनपट असणार आहे, तर रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ हा ब्रिक्स चित्रपट विभागाचा उद्घाटनपट ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ अशी असून, चित्रपटांच्या माध्यमातून भाषा, संस्कृती आणि भौगोलिक सीमा ओलांडणाऱ्या कथांचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

पोलिश दिग्दर्शक पावेल पाव्लिकोव्स्की यांच्या ‘फादरलँड’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवलेल्या या चित्रपटात नोबेल पुरस्कार विजेते लेखक थॉमस मान आणि त्यांची मुलगी एरिका यांच्या १९४९ मधील युद्धोत्तर जर्मनीतील प्रवासाची कथा मांडण्यात आली आहे. सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन यांच्या ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे. ‘आय मॅटर’ हा चित्रपट मध्य महोत्सवी चित्रपट म्हणून प्रदर्शित केला जाणार आहे.

यंदाच्या इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या भारतीय पॅनोरमा विभागात १८ भाषांमधील एकूण ७६ चित्रपटांचा समावेश आहे. रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ हा फीचर फिल्म विभागाचा उद्घाटनपट असेल, तर लडाखी भाषेतील ‘बिकमिंग’ हा नॉन-फीचर फिल्म विभागाचा उद्घाटनपट ठरणार आहे. या विभागात २५ फीचर आणि २० नॉन-फीचर चित्रपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे.

ब्रिक्स देशांच्या चित्रपटांना यंदा विशेष स्थान देण्यात आले आहे. ब्रिक्सच्या सर्व ११ सदस्य देशांतील चित्रपट या विभागात प्रदर्शित केले जाणार आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा या विभागाचा उद्घाटनपट असेल. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून प्रभू रामांच्या जीवनातील वनवासाच्या कालखंडाची कथा मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इफ्फीमध्ये त्याचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे.

Iffi-2026-over-150-films-from-86-countries-to-be-screened-dhurandhar-to-open-indian-panorama-ramayana-the-brics-section](https://www.etvbharat.com/en/entertainment/iffi-2026-over-150-films-from-86-countries-to-be-screened-dhurandhar-to-open-indian-panorama-ramayana-the-brics-section

यंदा स्पेनला ‘कंट्री ऑफ ऑनर’चा दर्जा देण्यात आला असून, स्पॅनिश चित्रपटांसाठी विशेष विभाग असेल. यात ‘द बॅड सन’, ‘त्रिनिदाद’, पेद्रो अल्मोदोवार दिग्दर्शित ‘बिटर ख्रिसमस’ आणि ‘पर्सिगिएन्डो अ मायकेल’ या चार चित्रपटांचा समावेश आहे. रशिया हा यंदाचा ‘पार्टनर कंट्री’ असून, रशियन चित्रपटांचेही विशेष प्रदर्शन होणार आहे.

महोत्सवात यंदा ‘अ‍ॅनिमेशन’ आणि ‘फिल्म्स अबाऊट फिल्म्स’ या दोन नव्या विभागांची भर पडणार आहे. अ‍ॅनिमेशन विभागात पाच चित्रपट दाखवले जातील. तर ‘फिल्म्स अबाऊट फिल्म्स’ या विभागात चित्रपटनिर्मितीची कला, प्रक्रिया आणि पडद्यामागील सर्जनशीलतेवर आधारित पाच चित्रपटांचा समावेश असेल.

नवोदित दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म्स’ ही स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. यात भारत, जर्मनी, बेल्जियम, इजिप्त, फ्रान्स-इटली आणि चीनमधील सात चित्रपटांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत १५ चित्रपट सहभागी होणार असून, विविध देशांतील महिला दिग्दर्शक आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या कामालाही विशेष स्थान देण्यात आले आहे.

याशिवाय ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमाच्या सहाव्या पर्वात चित्रपटनिर्मितीच्या १३ विभागांतील १०० निवडक तरुण प्रतिभावंत सहभागी होतील. त्यांच्यासाठी मास्टरक्लास, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि ४८ तासांचे चित्रपटनिर्मिती आव्हान आयोजित करण्यात येणार आहे. ‘वेव्ह्ज फिल्म बझार’च्या माध्यमातून निर्माते, दिग्दर्शक, वितरक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगातील प्रतिनिधींना सहनिर्मिती व व्यावसायिक सहकार्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यंदाच्या इफ्फीमध्ये जगभरातील चित्रपट, विविध भाषांमधील कथा आणि नव्या चित्रपट निर्मात्यांच्या कलाकृतींचा संगम अनुभवता येणार असून, जागतिक चित्रपट संस्कृतीच्या देवाणघेवाणीसाठी गोवा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरणार आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!