सिनेनामा 

IFFI 2026 : ‘धुरंधर’मधील व्यक्तिरेखा घडवताना आरशासमोर नव्हे, मनात केली तयारी! : राकेश बेदी

पणजी : अभिनय म्हणजे केवळ व्यक्तिरेखेची नक्कल नव्हे, तर त्या पात्राची मानसिकता समजून घेऊन त्याच्या भावविश्वात शिरणे होय. ‘धुरंधर’ चित्रपटातील जमील जमाली ही व्यक्तिरेखा साकारताना आपण केलेला सखोल अभ्यास आणि रंगभूमीवरील अनुभव महत्त्वाचा ठरल्याचे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी सांगितले.

५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) दुसऱ्या दिवशी गोव्यातील महोत्सवाच्या मीडिया सेंटरमध्ये ‘धुरंधर’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या हिंदी चित्रपटाने भारतीय पॅनोरमा विभागातील मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या श्रेणीचे उद्घाटन केले. या वेळी चित्रपटाच्या प्रॉडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरे यांनीही चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली.

आरशासमोर अभिनयाचा सराव नको!

जमील जमालीची व्यक्तिरेखा साकारण्याविषयी बोलताना बेदी यांनी रंगभूमीवरील प्रदीर्घ अनुभवाचा उल्लेख केला. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या हालचाली, संवादफेक आणि भावनिक प्रतिक्रिया या पटकथेतील प्रसंगांच्या गरजेतून निर्माण व्हायला हव्यात. केवळ एखाद्या व्यक्तीची नक्कल करून व्यक्तिरेखा जिवंत होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अभिनयाचा सराव आरशासमोर करण्याच्या पद्धतीबाबतही त्यांनी वेगळे मत मांडले. आरशात स्वतःकडे पाहत अभिनय केल्याने कलाकाराच्या प्रगतीवर मर्यादा येऊ शकतात. त्याऐवजी व्यक्तिरेखेची मानसिकता, तिची बोलण्याची पद्धत, प्रतिक्रिया आणि भावनिक बदल यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. पात्राची मानसिकता समजली की अभिनयातील बारकावे आपोआप व्यक्त होतात, असे त्यांनी सांगितले.

पाच दशकांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना ‘एक दुजे के लिए’, ‘तिरंगा’ आणि ‘चष्मेबद्दूर’ यांसारख्या चित्रपटांच्या लोकप्रियतेची आठवणही त्यांनी सांगितली. पूर्वी चित्रपटांना मोठी लोकप्रियता असली तरी डिजिटल माध्यमांचा अभाव असल्याने कलाकारांच्या कामाचा प्रसार मर्यादित होता. आज सोशल मीडियामुळे कलाकारांचे काम एका क्लिकवर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानमधील वातावरणासाठी ४० हून अधिक सेट्स

चित्रपटाच्या प्रॉडक्शन डिझाइनविषयी माहिती देताना सैनी एस. जोहरे यांनी पाकिस्तानमधील प्रत्यक्ष ठिकाणी चित्रीकरण करणे शक्य नसल्यामुळे निर्मिती पथकाने संशोधनावर भर दिल्याचे सांगितले. बातम्यांचे संग्रह, स्थानिक टोळ्यांमधील संघर्षांच्या नोंदी, शहरी रचना आणि गुगल मॅप्सच्या आधारे संबंधित परिसराचा अभ्यास करण्यात आला.

या संशोधनातून चित्रपटासाठी ४० हून अधिक प्रत्यक्ष सेट्स उभारण्यात आले. चित्रपटातील वातावरण आणि वास्तुरचना वास्तवदर्शी दिसावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेचे संचालन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक महेश कुमार यांनी केले. या संवादातून चित्रपटाच्या व्यक्तिरेखा निर्मितीपासून ते दृश्यविश्व उभारण्यापर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियेवर प्रकाश पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!