‘फळे असलेल्या झाडावरच लोक दगड मारतात’
कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी कंत्राटदार निवड निर्णयाच्या वादातून आरोप झाल्यानंतर आता कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. फळे लागलेल्या झाडावरच लोक दगड मारतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी याबाबत दिली.
मंत्री गावडे म्हणाले की, कला अकादमीच्या कामाच्या नामांकन आणि टेंडरबाबतचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला होता. असे असतानाही मला लक्ष्य करून टीका केली जात आहे. जेव्हा एखाद्या झाडाला फळे लागतात तेव्हा त्याच झाडावर लोक दगड मारत असतात, असे गावडे म्हणाले.
दरम्यान, अकादमीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे, हे मीच कशाला लहान मुलगाही सांगेल. मी दक्षता खात्याच्या अहवालानुसार भाष्य केले आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ता सावियो रॉड्रिग्ज यांनी केली आहे. रॉड्रिग्ज हे स्वतः भाजपचे असूनही त्यांनी भाजप सरकारमधील मंत्र्यांवर टीका केल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
तर मंत्री गोविंद गावडे यांनी, कोण सावियो रॉड्रिग्ज? मी त्याला ओळखत नाही, असा पलटवार रॉड्रिग्ज यांच्यावर केला आहे.