5 नोव्हेंबरला गोव्यात दाखल होणार ‘रामराज्य यात्रा’
फातोर्डा:
भारत भ्रमणावर निघालेल्या रामराज्य यात्रेचे गोव्यात 5 नोव्हेंबर रोजी आगमन होत आहे. यावेळी पत्रादेवी येथे सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान या रथ यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या नंतर ही यात्रा गोव्यातील इतर ठिकाणी भेट दिल्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये प्रस्थान करणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे गोवा विभाग मंत्री मोहन आमशेकार यांनी मडगाव येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी दक्षिण गोवा रामराज्य यात्रा आयोजन समिती अध्यक्ष भाई नायक, मठ मंदिर प्रमुख श्याम नायक, मडगाव प्रमुख निखिल आजगावकर, पांडूरंग शिरवईकर व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना आमशेकर यांनी सांगितले की, पत्रादेवी या ठिकाणी या रथ यात्रेचे आगमन झाल्यानंतर 11वाजता ही रथ यात्रा म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिर जवळ पोचणार आहे. या ठिकाणी स्थानिक आमदार व इतरांकडून या रथ यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
पणजीहून रवाना झाल्यानंतर वास्को येथील मंगोर हिल या ठिकाणी दुपारी दोन वाजता या रथ यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यानही रथयात्रा फातोर्डा येथील बोलशे सर्कल या ठिकाणी पोचणार आहे. या दरम्यान मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्याकडून या रथ यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.
बोलशे सर्कलपासून दवरली येथील मारुती मंदिरपर्यंत रथ यात्रेच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रामभक्तांनी या रथयात्रेच्या सहभागी व्हावे अशी विनंती दक्षिण गोवा रामराज्य यात्रा प्रमुख भाई नायक यांनी विनंती केली आहे. यानंतर ही रथयात्रा चिंचणी, कुंकळ्ळी व काणकोण या ठिकाणी थांबा घेतल्यानंतर पर्तगाळ मठ या ठिकाणी रात्री मुक्काम करेल. व नंतर दुसऱ्या दिवशी ही रथ यात्रा कारवार मार्गे कर्नाटक राज्यात प्रवेश करणार असल्याचे भाई नायक यांनी सांगितले.