सलग चौथ्या दिवशीही गोव्यात ‘मुसळधार’
मंगळवारी रात्री आणि आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे गिरी ग्राम पंचायतीसमोरील मुख्य रस्त्याला पूर्णतः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
या पाण्यातून मार्गक्रमण करताना दुचाकींना बरीच कसरत, तसेच काहींची वाहने बंद पडताहेत. परिणामी लोकांना गाडी ढकलत न्यावी लागत आहेत. तर काहीजण वाहनांचे नुकसान नको म्हणून दूर पल्ल्याच्या रस्त्यावर जाणे उचित समजत आहेत.
दुसरीकडे, या भागांतील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात मातीचे भराव टाकून अतिक्रमण केल्याने तसेच काँक्रीटकरण झाल्याने शेतातील पाण्याचा निचरा योग्यरित्या होण्यास अडथळा निर्माण होतोय, हे सत्य आता लपून राहिलेले नाही. आजही या भागांतील शेतात तसेच रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत होते.
गोव्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून, १२ ते १४ जुलै पर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत.
पेडणे बोगद्यात चिखलमिश्रित पाणी आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक मंगळवारी रात्रीपासून ठप्प आहे. ती वाहतूक आज (बुधवार) रात्री आठ वाजता सुरु होण्याची शक्यता आहे.