ग्रंथोत्सवाचे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजन
सातारा (अभयकुमार देशमुख) :
ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचनसंस्कृतीमध्ये वाढ व्हावी व ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी तसेच प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा कार्यालयामार्फत शनिवार दि. 19 व रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी कवयित्री शांता शेळके नगरी, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, जुना राजवाडा, गोल बागेसमोर, सातारा येथे ग्रंथोत्सव- 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या ग्रंथोत्सवाअंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी संमेलन, महाचर्चा (लेखक व वाचक संवाद), व्याख्यान, ग्रंथ प्रदर्शन व विक्री इ. साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
या ग्रंथोत्सवामध्ये जिल्हयातील 395 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी, सातारा शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, राज्यातील शासकीय मुद्रणालये, प्रकाशक व ग्रंथविक्रेते यांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
ग्रंथोत्सवाची सुरुवात तालीम मैदान संघ ते कार्यक्रम स्थळ यामार्गे आयोजित केलेल्या ‘ग्रंथदिंडी’ ने करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभामध्ये डॉ. श्रीपाल सबनीस, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या समारंभानंतर या दोन दिवसांमध्ये ‘प्रेरणा साहित्य निर्मिती मागची’ या विषयावर परिसंवाद व सायंकाळी ‘ज्येष्ठ व उदयोन्मुख कविंच्या कवितांचे’ कवी संमेलन, दुसऱ्या दिवशी ‘ग्रंथालय, वाचनसंस्कृती आणि लोकशिक्षण’ या विषयावर महाचर्चा, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्त ‘स्वातंत्र्य संग्रामातील सातारा जिल्हा’ या विषयावर व्याख्यान इ. साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शेवटी ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रमामध्ये श्री. विनोद कुलकर्णी, प्रतिनिधी, महाराष्ट्र साहित्य परिषद, जिल्हा सातारा यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. श्रीधर सांळुखे, वक्ते व विचारवंत, सातारा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीत व वाचन संस्कृतीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवांतर्गत सलग दोन दिवस शासकीय प्रकाशने, स्पर्धा परीक्षेचे ग्रंथस्टॉल आणि अन्य मान्यवर प्रकाशनांचे ग्रंथ प्रदर्शनासाठी व विक्रीकरिता उपलब्ध असणार आहेत.
शासकीय प्रकाशनांची पुस्तके, दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थी व शिक्षक आणि जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालये यांचा सहभाग इत्यादी या ग्रंथोत्सवाची प्रमुख वैशिष्टये आहेत. ग्रंथ, साहित्यिक व वाचक यांच्या आनंददायी व ज्ञानवर्धक मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रंथप्रेमी, वाचक व नागरिकांनी सहभागी होऊन या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमित सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव, ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समिती, सातारा यांनी केले आहे.