गुजरातवर पुन्हा भाजपराज…
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असून, सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे आम आदमी पक्षही राज्याच्या राजकारणार प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष आहे.
एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचा फायदा होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या भाजपाच्या हाती येतील.गुजरातमध्ये भाजपाला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते १३ जागांवर समाधान मानावे लागेल, असे अंदाज आहेत. बहुमतासाठी ९२ जागा जिंकणे आवश्यक आहे.
गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. सी आर पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने गुजरातमधील निवडणूक लढली असून, रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
गुजरातमधील निकाल धक्कादायक असल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी केलं आहे. “गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सरकारला आणण्याचा जनतेचा निर्णय धक्कादायक आहे. निकाल पाहता आम्ही कोणत्याही बाजूने कमी पडलेलो नाही,” असं जगदीश ठाकूर म्हणाले आहेत.
“आम्ही चांगला लढा दिला आहे. पण तरीही आम्ही सरकार स्थापन करु शकलेलो नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पराभवाचं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “यावर आम्ही चर्चा करु. विजय किंवा पराभवाची एक, दोन कारणं नाही आहेत. तसंच भाजपासंबंधी प्रेम आहे असंही नाही”.
गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाची सत्ता येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. १० ते ११ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीसाठी हजर राहणार आहेत.