रौप्यमहोत्सवी विजय दिवसाचे कार्यक्रम जाहीर
कराड (अभयकुमार देशमुख) :
भारतीय सैन्यदलाच्या बांग्लामुक्तीतील विजयाप्रित्यर्थ कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथे दरवर्षी विजय दिवस समारोह साजरा केला जातो. यंदा समारोहाचे रौप्यमहोत्सव वर्ष असुन समारोहात १३ ते १६ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
विजय दिवस समारोहातील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समितीचे विनायक विभुते, सहसचीव विलासराव जाधव, उद्योजक दिपक अरबुणे, सलिम मुजावर, विजय दिवस समितीचे मीनल ढापरे, चंद्रकांत जाधव , रमेश जाधव, प्रा. बी एस खोत, रत्नाकर शानभाग, परवेझ सुतार, महालिंग मुंढेकर, सतीश उपळाविकर, आदी उपस्थित होते. अॅड मोहिते म्हणाले, कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा रौप्यमहोत्सव विजय दिवस साजरा होत आहे.
त्याचा प्रारंभ शोभा यात्रेने मंगळवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजता विजय दिवस चौकातून सुरू होईल. माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गट शिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, राष्ट्रवादीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे, भाई गंगाराम गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांच्या उपस्थितीत त्यास प्रारंभ होईल. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, तहसिलदार विजय पवार, माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, उद्योजक जयदीप अरबुणे, उद्योजक संदीप कोटणीस यांच्या उपस्थितीत होईल. सायंकाळी सहा वाजता स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात सायंकाळी सहा वाजता होईल. त्याचे उद्घाटन संगीता काणे, आलापिनी जोशी, सुधीर शिराळकर, इब्राहिम सय्यद, बाळ देवधर यांच्या हस्ते होईल.
बुधवारी (ता.१४) सकाळी साडेआठ वाजता चित्रकला स्पर्धेचे येथील यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन चित्रकार प्राची शहा, डॉ. सुधीर कुंभार, महिला मर्चंटच्या भारती मिणियार, ऑनररी फ्लाईंग लेष्टनंट बी. जी. जाधव, लक्ष्मण भोसले यांच्या हस्ते होईल. त्यानंत सकाळी साडेनऊ वाजता येथील छत्रपती शिवाजी आखाड्यामध्ये रक्तदान शिबीर होईल. त्याचे उदघाटन तहसिलदार विजय पवार, मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, कालिकादेवी कुटुंब प्रमुख मुनीरभाई बागवान, शिवसेना सातारा जिल्हा उपप्रमुख नितिन काशीद, उद्योजक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी एक वाजता येथील वेणुताई चव्हाण सभागृहात महासैनिक मेळावा होईल. प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजित पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर विजयकुमार पाटील, तहसिलदार विजय पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदिले, भूमी अभिलेख उपअधिक्षक बाळासाहेब भोसले, लेफ्टनंट कमांडर दिग्विजय जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव उपस्थित राहतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी एकात्मता दौडला गुरुवारी (ता.१५) सकाळी साडेआठ पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजित पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी विधानपरिषद सदस्य आनंदराव पाटील, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, उद्योजक सलीम मुजावर, उद्योजक इरफान सय्यद यांच्या उपस्थितीत प्रारंभ होईल. त्याचा समारोप छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर होईल.
विजय दिवसचा शुक्रवारी (ता.१६)मुख्य दिवस असुन सकाळी साडेआठ वाजता विजय दिवसच्यावतीने तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी स्थळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील व सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्यावतीने मानवंदना दिली जाईल. समारोहाच्या मुख्य कार्यक्रमास दुपारी दोन वाजता येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयममध्ये प्रारंभ होईल. त्यास माजी केंद्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित राहतील.