google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘कोरोना पंतप्रधान आणि भाजपच्या सूचनांचे पालन करतो’



पणजी :

कोविड व्हायरस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची परवानगी घेवून भाजपच्या राजकीय सोयीनुसारच पसरतो हे आता सर्वांना कळून आले आहे असा जबरदस्त टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.


नवीन जुवारी पुलाच्या उद्घाटनाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर बोचरी टीका करताना काँग्रेस अध्यक्षांनी भाजप “मिशन कमिशन” मधून माया कमावण्यासाठी चटावले असल्याचे म्हटले आहे.


आमचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड यश मिळाल्याने घाबरलेले केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांना पत्र लिहून कोविड-१९ चा हवाला देत यात्रा थांबवण्याची विनंती केली. याउलट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नवीन जुवारी पुलावरील कार्यक्रमासाठी जनतेला मोठ्या संख्येने येण्याचे खुले निमंत्रण देत आहेत, याकडे अमित पाटकर यांनी लक्ष वेधले आहे.


काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी पुलाच्या कामाच्या दर्जाची जबाबदारी कंत्राटदारावर असल्याचे पत्रकारांना सांगितले होते याची आठवण करुन देत, भाजपच्या घरच्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्र्यांनी जनतेची गैरसोय न बघता पुलाचे उद्घाटन तीन दिवस पुढे ढकलल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एकंदर प्रकाराची दखल घेतील का?, असा सवाल अमित पाटकर यांनी केला आहे.

उद्घाटनालाच उत्सव साजरे करण्यासारखे काही नाही. नवीन जुवारी पूल गुणवत्ता चाचणी अगोदर पास करू द्या. अटल सेतू प्रत्यक्षात अपूर्ण असताना व्यक्तिगत स्वार्थासाठी त्याचे “जोशात” उदघाटन करण्यात आले होते. दुर्देवाने ‘अटल सेतू’चे काम आजही अपुर्ण असून गोमंतकीयांना भयानक त्रास सहन करावे लागत आहेत, असे अमित पाटकर यांनी नमूद केले आहे.


मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावेळी गोव्यातील जनतेचे प्रचंड हाल झाले. इव्हेंट मॅनेजमेंटमधून माया कमवण्याच्या भाजपच्या धोरणामुळे नवीन जुवारी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात गैरव्यवस्थापन आणि गोंधळ नक्कीच होणार आहे. गोमंतकीयांनी पुलावर आपला जीव धोक्यात घालू नये असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.

गोमंतकीयांना जुवारी पूल “भेट” देण्यासाठी उत्सव आयोजित केला आहे या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा मी निषेध करतो. हा पूल करदात्यांच्या पैशातून बांधण्यात आला असून गोमंतकीयांना भेट देण्याची ती भाजपची खासगी मालमत्ता नाही, असे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!