शाळेची सहल नेणारी बस आणि कंटेनरमध्ये अपघात
कराड ( अभयकुमार देशमुख) :
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे गावच्या हद्दीत शाळेची सहल घेऊन जाणा-या एसटी बस व कंटेनर यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये तीन विद्यार्थांसह दोन शिक्षक किरकोळ तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची सहल कोकण दर्शन करण्यासाठी (दि. 16) जानेवारी रोजी गेली होती. या सहलीत 5 एसटी बसेसमधून 200 विद्यार्थी व 15 शिक्षक सहभागी झाले होते. कोकण दर्शन करून सहल परतीच्या मार्गावर असताना मुंबई- गोवा महामार्गावर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी जेवन करून सहल वाघोलीच्या दिशेला निघाली होती.
या दरम्यान, एसटी बस क्रमांक (एमएच- 14- एचजी- 8492) या बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या बसमध्ये 40 विद्यार्थी व काही शिक्षक होते. कराड ते सातारा लेन वरून जात असताना तासवडे गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
पुढे चाललेला कंटेनर क्रमांक (एचआर- 67 बी- 2617) ला पाठीमागून एसटी बसने धडक दिली. एसटीची धडक भीषण असल्याने बसची क्लिनर बाजू काही अंतर फाटत गेली. यामध्ये माध्यमिकचे तीन विद्यार्थी व तीन शिक्षक जखमी झाले. अपघाताची माहिती स्थानिक नागरिक पोलिस यांना समजताच घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींपैकी दोन विद्यार्थी व तीन शिक्षक यांना कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य एका विद्यार्थ्याला सातारच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद करण्याचे काम तळबीड पोलिस ठाण्यात सुरू आहे