‘भाजप सरकारने आई म्हादईची हत्या केली’
गृहमंत्री अमित शहा यांनी आज बेळगाव येथे केलेल्या भाषणात आई म्हादईचे रक्षण आणि जतन करण्यासाठी गोव्यातील काँग्रेस पक्षाची बांधिलकी मान्य केली. भाजप सरकारने आमची जीवनदायीनी आई म्हादईची हत्या केल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे असा घणाघात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
आज बेळगाव येथे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक सेकंदही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हादईच्या हत्येसाठी त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
सत्य नेहमी जिंकते, देव महान आहे! बेळगाव येथील गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, मुख्यमंत्री सावंत यांनी गोमंतकीयांचा विश्वासघात करून आई म्हादईची हत्या करण्याच्या कटाला संमती देण्यासाठी गृहमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात विरोधी आमदारांचा समावेश टाळला, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
गोव्यातील जनतेला आता कळेल की, काँग्रेस पक्षाने 2022च्या आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हादईच्या पाण्याचा एक थेंबही वळवता येणार नाही, असे नमूद केले होते. आम्ही आमच्या वचनबद्धतेवर ठाम राहिलो आणि पुढेही राहणार, असे युरी आलेमाव म्हणाले.
केंद्र, कर्नाटक आणि गोव्यातील तिहेरी इंजिन भाजप सरकारने गोमंतकीयांचा विश्वासघात करून आमची जीवनदायीनी आई म्हादईचा गळा घोटण्यासाठी वेळोवेळी कट रचला असे युरी आलेमाव म्हणाले.
मी सर्व गोमंतकीयांना आवाहन करतो की, भाजपच्या गोवा विरोधी निर्णयाचा निषेध करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र यावे. भाजप सरकारला कायमचा धडा शिकवायलाच हवा, असे युरी आलेमाव म्हणाले.