‘म्हादई विषयी सभागृह समितीची तातडीने बैठक बोलवा’
म्हादई विषयी तातडीने सभागृह समितीची बैठक बोलवावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी समितीचे अध्यक्ष आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना लिहीले आहे.
तसेच म्हादईवरील सभागृह समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून खुलासा घ्या अशीही मागणी केली आहे. “असे न झाल्यास ही सभागृह समिती फक्त गोवेकरांच्या डोळ्यांना पाणी पुसण्या पुरती नेमण्यात आली आहे असे गोव्यातील लोक समजतील” अशी टिकाही त्यांनी यावेळी सरकारवर केली.
“मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या सरकारच्या एका चुकीच्या खेळीमुळे म्हादईवरील आमचा हक्क कर्नाटककडे गेला आहे यामुळे गोव्याने म्हादई नदी कायमची गमावली आहे” असेही त्यांनी सांगितले.
“काल शहांनी सांगितले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या सरकारला सोबत घेवून म्हादईचे पाणी वळविण्याचा निर्णय घेतला यावरुन असे स्पष्ट होते की, मुख्यमंत्र्यांची फक्त संमती आहे असेच नव्हें तर या कटात ते स्वतः भागीदार आहेत असे वाटते. मुख्यमंत्री जर खरे गोयकार असतील तर त्यांनी अमित शहांनी वक्तव्य केले ते खोटे आहे असे सांगावे हे चॅलेंज मी त्यांना दिले होते.
मात्र त्यांनी यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा अभ्यास करून प्रतिक्रीया देऊ असे म्हंटले आहे. गोवेकरांची झोप उडवून मुख्यमंत्री झोपले आहेत. मुख्यमंत्र्यांना आता झोपेतून उठवण्याची वेळ आली आहे. जर म्हादईबाबतच्या निर्णयात मुख्यमंत्री सावंत जर भागीदार असतील तर हे गोव्याच्या जनतेला कळायला हवे असे सरदेसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत गोवेकराना मूर्ख समजतात का असा सवाल करून त्यासाठीच आता म्हादई प्रश्नावर गठीत केलेल्या सभागृह समितीने त्यांच्याकडून खुलासा मागण्याची गरज आहे. जर समितीचे अध्यक्ष हे करण्यास तयार नाहीत तर ही सभागृह समिती फक्त जनतेच्या डोळ्यांना पाणी पुसण्या पुरती नेमण्यात आली आहे हे सिद्ध होईल असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.