टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या यादीनुसार अदानीला एका दिवसात 8 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 29 जानेवारी रोजी त्यांची एकूण संपत्ती 92.7 अब्ज डॉलर होती, जी सोमवारी 84.4 अब्ज डॉलरवर आली. यामुळे अदानी या यादीत 11व्या स्थानावर आले आहेत.
एका आठवड्यात अदानीची (Gautam Adani) नेट वर्थ 35.6 बिलियन डॉलरने कमी झाली आहे. 20 नोव्हेंबर 2022 रोजी अदानींची एकूण संपत्ती 150 बिलियन डॉलरवर पोहोचली होती. त्यानंतर त्यांच्या एकूण संपत्ती 65.6 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. अदानी ग्रुप भारतातील सर्वात मोठा बंदर ऑपरेटर आहे. भारतातील सर्वात मोठा थर्मल कोळसा उत्पादक आणि सर्वात मोठा कोळसा व्यापार देखील याच ग्रुपकडे आहे.
अदानी 4 एप्रिल 2022 रोजी सेंटीबिलियनर्स क्लबमध्ये सामील झाले होते. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंटीबिलियनर्स म्हणतात. त्यापूर्वी, एप्रिल 2021 मध्ये, अदानींची एकूण संपत्ती 57 अब्ज डॉलर होती. 2021-2022 या आर्थिक वर्षात अदानींची एकूण संपत्ती जगात सर्वात वेगाने वाढली.
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रीसर्च या संशोधन संस्थेच्या अहवालात अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन, मनी लाँड्रिंग आणि अकाउंटिंग फ्रॉडमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली होती.
हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर अदानी ग्रुपने 413 पानांचे उत्तर दिले होते. अदानी ग्रुपने हा रिपोर्ट म्हणजे भारतावरील हल्ल्याचा कट असल्याचे म्हटले होते. चुकीची माहिती आणि अर्धवट तथ्ये यांची सांगड घालून हा अहवाल तयार केला असून त्यातील आरोप निराधार आहेत, बदनामी करण्याच्या उद्देशाने केले आहेत, असे अदानी समुहाने म्हटले होते.
हे आहेत जगातील सर्वाधिक श्रीमंत
1) बर्नाड अरनॉल्ट ——– 189
2) एलन मस्क —— 160
3) जेफ बेझॉस —— 124
4) बिल गेट्स —— 111
5) वॉरेन बफे ——- 107
6) लॅरी एरिसन ——- 99.5
7) लॅरी पेज ——— 90
8) स्टीव्ह बाल्मर —–86.9
9) सर्गेई ब्रीन ——86.4
10) कार्लोस स्लिम हेलू —— 85.7
11) गौतम अदानी —— 84.4
12) मुकेश अंबानी —— 82.2