मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त युवकाने केला अवयव दानाचा संकल्प
सातारा (महेश पवार) :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनानिमित्त येथील एका युवकाने मृत्युपश्चात आपले अवयव दान करण्याचा संकल्प करुन समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. या युवकाचे नाव शुभम शिंदे असे असून तो युवा सेना वाई तालुकाप्रमुखपदी कार्यरत आहे. त्याच्या या प्रेरणादायी सत्कार्याचे कौतुक करीत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शुभमचा सत्कार केला.
यशवंतनगर, ता. वाई येथील रहिवाशी असलेल्या शुभम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्याची प्रेरणा घेऊन मृत्युपश्चात अवयव दान करण्याचा संकल्प केला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी गुरुवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी दानपत्र लिहून दिले. त्यांच्या या आदर्शवत कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सायंकाळी वाई येथे बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शुभम शिंदे यांचे बाळासाहेबांची शिवसेना जिल्ह्याच्यावतीने कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी विकास शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.