श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ
भाविकांच्या साक्षीत आणि विविध धार्मिक विधीसह राजदैवत असलेल्या आणि छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला गुरुवारपासून अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देवस्थानला भेट दिलीय.
शिवकालीन इतिहास असलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सपत्नी श्रींवर अभिषेक केला. त्यांच्यासोबत पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही श्रींवर अभिषेक करून आपली सेवा अर्पण केली.
यावेळी आमदार प्रेमेंद्र शेटहेही उपस्थित होते. श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या नूतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री फळदेसाई यांनी सप्तकोटेश्वराचरणी आपली सेवा रुजू केली.
दरम्यान सध्या नार्वे गावात मंगल आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे. आज शनिवारी मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी 9 वाजल्यापासून गोवा व महाराष्ट्रातील विविध किल्ले आणि अन्य स्थानातील पवित्र जलाने जलाभिषेक होणार आहे.
सायंकाळी 4 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल, प्ररातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या मंदिराचे तसेच तेथील पवित्र तळीचे लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याच्या भूमिकेचे स्वागत केले असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळी येथिल चीफटेन्स मॅमोरीयल, मडगावचे ऐतिहासिक लोहिया मैदान, असोळणा व पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके, पणजीचे आझाद मैदान जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत याची आणि सदर स्मारके त्वरीत अधिसूचीत करण्याची वाट पाहत आहेत, असे ट्विट केले आहे.