‘वीज खात्याचा प्रोफॉर्मा व डीसीबी अहवाल जाहीर करावा’
पणजी :
शासनाच्या अकार्यक्षमतेसाठी ग्राहकांवर सहा टक्के वीज दरवाढीचा बोजा टाकणे अजिबात योग्य नाही. मी संयुक्त वीज नियामक आयोगाकडे (जेईआरसी) वीज खात्याला प्रोफॉर्मा तसेच मागणी, संकलन आणि शिल्लक अहवाल सार्वजनिक करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि कुंभारजूवा गट कॉंग्रेस अध्यक्ष विशाल वळवईकर यांनी आज पणजी येथील संयुक्त वीज नियामक आयोगाच्या जनसुनावणीला हजेरी लावली आणि गोवा सरकारच्या प्रस्वावीत वीज दरवाढीला विरोध केला.
मी मुख्य वीज अभियंत्याना पत्र लिहून राज्यातील वीज गळतीची टक्केवारी तसेच वीज चोरी नियंत्रित करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या कारवाईचा तपशील मागवला आहे. सदर माहिती मिळाल्यावर मी माझे लेखी आक्षेप आयोगासमोर नोंदवीन, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
गोवा वीज खात्याने आज केलेल्या आयोगासमोर केलेल्या सादरीकरणात प्रस्तावित वीज दरवाढ कोळशाच्या आयातीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रातील भाजप सरकारने 2022 पर्यंत 175 गिगाव्हेट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट जाणीवपूर्वक साध्य केलेले नाही. भाजपचे भांडवलदार मित्र अदानी समुहाला मदत करण्यासाठी गोव्यातील भाजप सरकारने 358 मॅगाव्हेट उद्दीष्टाच्या केवळ 33 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठले आहे असा दावा अमित पाटकर यांनी केला.
प्रस्तावित वीज दरवाढीला काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करत असून जेईआरसीने वीज दरवाढीचा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी आम्ही केली आहे. कोविड महामारीच्या काळातील आर्थिक संकटातून लोक नुकतेच सावरत आहेत आणि असंवेदनशील भाजप सरकार त्यांच्यावर पुन्हा आर्थिक भार टाकू इच्छित आहे, असे अमित पाटकर म्हणाले.