‘पक्ष कार्यालयात बसून कृष्णकृत्ये करणाऱ्यांना विकास दिसेल कसा?’
सातारा (महेश पवार) :
सत्ता असो वा नसो, आमचे नेते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्याचा चौफेर विकास केला आहे. निवडणुकीपुरते बाहेर पडणाऱ्या राष्ट्रवादीच्या चांडाळचौकडीला तालुक्याचा झालेला विकास दिसणारच नाही. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या विकासकामांची पोचपावती तालुक्यातील जनता देईल. पक्ष कार्यालयात कृष्णकृत्ये करत बसणाऱ्यांनी पोचपावती द्यावी एवढी त्यांची उंचीही नाही आणि पात्रताही नाही, असा टोला लिंब जिल्हा परिषद गटातील युवानेते संभाजी इंदलकर यांनी राजेंद्र लवंगारे यांना लगावला.
राजापुरी ता. सातारा येथे दीपक पवार, अमित कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात लवंगारे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तालुक्याचा विकास केला नसल्याची टीका केली होती. या टीकेला इंदलकर यांनी पत्रकाद्वारे खरमरीत उत्तर दिले आहे. इंदलकर म्हणाले, ज्या अभयसिंह महाराजांचे तुम्ही नाव घेताय, आणि राष्ट्रवादीने भरभरून प्रेम दिले म्हणताय, त्याच अभयसिंह महाराजांना राष्ट्रवादीने मंत्रिपदापासून बाजूला ठेवून जिल्ह्याचे नुकसान का केले? याचे उत्तर देण्याची हिम्मत चांडाळचौकडीचे म्होरके म्हणून मिरवणाऱ्या लवंगारे यांच्याकडे आहे का? महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष होतं, त्यावेळी तालुक्यात एकतरी मोठे काम तुम्हाला आणता आले का? सत्ता असो वा नसो आमचे नेते विकासकामे खेचून आणतात. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी संपूर्ण तालुक्याचा कायापालट केला आहे. त्यामुळे कोणा पीठ माग्याने सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.
गेल्या १० – १५ वर्षात एक ग्रामपंचायत, अन एखादी सोसायटी ज्यांना घेता आली नाही ते तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. ज्यांना लोक दारात उभे राहू देत नाहीत अशांनी, तालुक्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब महाराज आणि कार्यसम्राट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबद्दल बोलून आपले महत्व वाढेल या आशेपोटी वाट्टेल ते बडबडू नये. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या विकासकांचे मोजमाप करावे एवढी आपली उंची आणि पात्रता नाही, याची जाण ठेवा. कोणी तालुक्याचा विकास केला हे जनतेला चांगले माहित आहे त्यामुळे उगाच गरळ ओकून स्वतःचे काळे तोंड आणखी काळे करू नका, असा सल्लाही इंदलकर यांनी दिला आहे.