‘टँकर व व्यापारी वाहनांकडून सरकारला कोणताही महसूल नाही’
पणजी :
गोव्यातील टॅंकर तसेच इतर व्यापारी वाहनांकडून वाहतूक विभागाला कोणताच महसूल मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोव्यात व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा कोणताही डेटा परिवहन विभागाकडे नसल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. यावरून भाजप सरकार राज्याला शुन्य महसूल देणाऱ्या टँकर आणि व्यावसायिक वाहन माफियांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
सांडपाणी वाहतूक करणाऱ्या पाण्याच्या टँकरवर कारवाई करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेस पक्षाने आज वाहतूक खात्यात घुसून संचालक राजन सातार्डेकर यांची खरडपट्टी काढली. राज्यातील वाढत्या जीवघेण्या अपघातांबाबतही त्यांना जाब विचारला. गोव्यातील बेकायदेशीर टँकर चालवणाऱ्यांवर कारवाई करणे आणि रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्याच्या मागणीसाठी परिवहन संचालकांना दोन निवेदने देण्यात आली.
गोवा विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरावरुन गोव्यात व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणार्या केवळ 26 दुचाकी आहेत असे नमूद केले आहे. याचा अर्थ सरकारला व्यावसायीक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक, पिकअप, रिक्शा तसेच इतर वाहनांकडून महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट होते असे अमित पाटकर म्हणाले.
सांडपाणी वाहतूक करताना नागरिकांनी पकडलेल्या पाण्याच्या टँकरवर त्यांच्या विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे परिवहन संचालकांनी स्पष्टपणे मान्य केले. आम्ही दबाव आणल्यानंतर त्यांनी आता कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले.
गोव्यातील जीवघेण्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही कृती योजना नाही. गोव्यातील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते कृत्रिम बुद्धिमत्ता सिग्नल सुरू करणार असल्याचे वाहतूक संचालकांनी सांगितले. मेरशी जंक्शनवर लावलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिग्नलचे तीन तेरा वाजले आहेत. या सिग्नलमुळे जंक्शनवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.
सरकारला होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील महसूलाचे नुकसान तसेच राज्यातील टँकर माफियांच्या कारवाया यांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही पुन्हा एकदा करतो, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळात अमरनाथ पणजीकर, एव्हरसन वालीस, मनीषा उसगावकर, अर्चित नाईक, जॉन नाझरेथ, विजय भिके, विवेक डिसिल्वा, सुदिन नाईक आदींचा समावेश होता.